महागाव वनपरिक्षेत्राचा पुणेरी कारभार
By Admin | Updated: November 29, 2014 02:19 IST2014-11-29T02:19:38+5:302014-11-29T02:19:38+5:30
महागाव तालुक्यातील जंगलांचे संरक्षण थेट पुण्यातून केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

महागाव वनपरिक्षेत्राचा पुणेरी कारभार
महागाव/पुसद : महागाव तालुक्यातील जंगलांचे संरक्षण थेट पुण्यातून केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या या कारभारामुळे महागाव तालुक्यातील वन कर्मचाऱ्यांना आॅक्टोबरपासून वेतन मिळू शकलेले नाही.
महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून शिवाजी नाईकवाडे कार्यरत आहेत. मात्र ते महिन्यातील अनेक दिवस पुण्यातूनच महागावचा कारभार चालवित असल्याचे सांगण्यात आले. ते पुण्याला जाण्यापूर्वी आपल्या कनिष्ठांजवळ सुटीचा अर्ज देऊन जातात. या काळात वरिष्ठांचा दौरा झाल्यास अर्ज दाखविला जातो. मात्र कुणाचा दौरा न झाल्यास अथवा विचारणा न झाल्यास नाईकवाडे पुण्याहून परतल्यानंतर हा अर्ज हळूच काढून घेऊन आपली उपस्थिती दाखवितात. त्यांच्या या पुणेरी कारभाराचा फटका महागाव तालुक्यातील जंगलांना बसतो आहे. वन अधिकारीच जंगल सोडून पुण्यात राहत असल्याची खात्री असल्याने तेलंगणा तसेच मराठवाड्यातील सागवान तस्कर या भागात सक्रिय झाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी नाईकवाडे आणि संबंधित लिपिकाच्या दुर्लक्षामुळे महागाव तालुक्यातील वन कर्मचाऱ्यांचे आॅक्टोबरपासून वेतनही मिळालेले नाही. सीएमपी मेथर्डचे अज्ञान आणि दुर्लक्ष यासाठी कारणीभूत ठरले. आरएफओ नाईकवाडे हे सेवानिवृत्तीवर असलेल्या पुसदच्या डीएफओंनाही जुमानत नसल्याचे बोलले जाते. महागाव प्रमाणेच काळीदौलत वन परिक्षेत्राचे कर्मचारीही वेतनापासून वंचित आहेत. हे परिक्षेत्र नुकतेच वेगळे झाले असले तरी त्याचे वेतनाचे अधिकार अद्याप महागावचे आरएफओ नाईकवाडे यांच्याकडेच आहे. या दोन परिक्षेत्रातील सुमारे ९० वन कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. संवेदनशील आणि हेवीरेंज म्हणून महागावची ओळख असतानाही वरिष्ठांच्या नाकावर टिच्चून थेट पुण्यातून कारभार चालविला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाईकवाडे यापूर्वी नेरला समकक्ष पदावर होते. तेथे जिल्हा नियोजन समितीतील कामांचा गोंधळ, वृक्ष कटाई यामुळे त्यांची खरबी येथे वन्यजीव विभागात विशेष सेवा विभागाचे वन क्षेत्रपाल म्हणून बदली झाली होती. मात्र त्यांनी रुजू न होता रजेवर जाणे पसंत केले. या काळात त्यांनी थेट उमरखेडच्या काँग्रेस नेत्याशी संधान बांधून महागावात आरएफओ म्हणून आपली नियुक्ती करून घेतली.
काही दिवसांपूर्वी महागाव तालुक्यातील फुलसावंगी वनवर्तुळाअंतर्गत बोरगाव-डोंगरगाव जंगलात ३३ सागवान वृक्षांची अवैध तोड उघडकीस आली होती. या प्रकरणात निजामाबादवरून आरोपींना पकडण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली. मात्र अद्याप यातील सागवानाची जप्ती झाली नाही किंवा वृक्षतोडीला जबाबदार कुणावर कारवाईही केली गेली नाही. २७ नोव्हेंबरला महागाव तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी दौऱ्यावर आलेल्या डीएफओंना नाईकवाडे यांच्या पुणेरी कारभाराची मौखिक तक्रार केली असता त्यांना लेखी तक्रार मागण्यात आली. (लोकमत चमू)