शिक्षिकांवरील अत्याचाराचा पुसदमध्ये निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:34 IST2019-08-28T22:32:00+5:302019-08-28T22:34:09+5:30
मुंबई येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांवर अमानुषपणे लाठीहल्ला केला. यात अनेक शिक्षक जखमी झाले.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध करीत त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.

शिक्षिकांवरील अत्याचाराचा पुसदमध्ये निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : विना अनुदानित उच्च माध्यामिक कृती समितीच्या सदस्यांवर मुंबईत पोलिसांनी लाठीचार्ज केला. या हल्ल्लयाचा तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी निषेध नोंदविला.
मुंबई येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांवर अमानुषपणे लाठीहल्ला केला. यात अनेक शिक्षक जखमी झाले.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध करीत त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.
गेल्या १५ वर्षांपासून विनावेतन ज्ञानदानाचे कार्य विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक करीत आहे. अनुदानाच्या मागणीसाठी त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. गेल्या २२ दिवसांपासून संवैधानिक मार्गाने त्यांचा लढा सुरू आहे. याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. उलट सोमवारी शिक्षिकांवरच लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आले. ही घटना निषेधार्ह असून घटनेची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
एसडीओंना निवेदन देताना विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, पुरोगामी शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षण संघर्ष संघटना, शिक्षक महासंघ, विनाअनुदानित कृती समिती, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, एकल शिक्षक सेवा मंच, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती आदी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.