प्रकल्पग्रस्त शेतकरी देशोधडीला

By Admin | Updated: December 13, 2014 02:27 IST2014-12-13T02:27:07+5:302014-12-13T02:27:07+5:30

महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उदात्त हेतूने तालुक्यात दोन मोठे धरण बांधण्यात आले.

Projected farmer, Desodhi | प्रकल्पग्रस्त शेतकरी देशोधडीला

प्रकल्पग्रस्त शेतकरी देशोधडीला

अखिलेश अग्रवाल पुसद
महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उदात्त हेतूने तालुक्यात दोन मोठे धरण बांधण्यात आले. परंतु उपसा जलसिंचन योजना तसेच वीज व दळणवळणाच्या व्यवस्थेअभावी ३५ वर्षांपासून माळपठारावरील शेतकरी देशोधडीला लागले आहे.
मोप, होरकड व शिवणी या गावातील बहुसंख्य कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी स्थलांतरण केल्याने ही गावे ओस पडली आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याने काँग्रेस नेते अ‍ॅड. सचिन नाईक यांनी या गावातील शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुसद तालुक्याच्या विकासासाठी इसापूर व पूस ही धरणे बांधण्यात आली. इसापूर धरणात जी गावे गेली त्या गावातील शेतकऱ्यांकडे जी जमीन होती त्यापैकी आता २० टक्के जमीन त्यांच्याकडे उरली आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले. परंतु त्या गावांमध्ये आजही कोणत्याही सुविधा नाही. इसापूर धरण पुसद तालुक्यात असताना आज हे धरण मराठवाड्यासाठी जीवनदायिनी बनले आहे. परंतु ज्यांची या धरणासाठी शेती व घरे गेली त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. पुसद तालुक्यातील मोप, होरकड व शिवणी या गावात ३५ वर्षांपूर्वी अनेक सदन शेतकऱ्यांकडे १०० ते १५० एकर शेती होती. परंतु आज हे शेतकरी देशोधडीला लागले आहे. नावाला त्यांचे पुनर्वसन झाले.
पाच ते दहा एकर कोरडवाहू जमिनीवर त्यांची कशी तरी गुजरान सुरू आहे. जमिनी धरणात गेल्याने त्यांना पोरके व्हावे लागले. या गावांमध्ये धनगर व हटकर समाजाची लोकसंख्या अधिक आहे. या गावांना अ‍ॅड.नाईक यांनी भेट दिली असता मोप येथील तुकाराम सवळे, दौलतराव मस्के, अशोक सवळे, दत्तराव मस्के, चंपतराव खरात, सीर्पतराव सवळे, शिवणी येथील सरपंच कुबेर मस्के, हनवंतराव मस्के, प्रकाश धुमनर, होरकड येथील पंजाबराव मस्के या वैभवशाली जीवन पाहणाऱ्या नागरिकांची आज दुरावस्था झाल्याचे दिसून आले. पुनर्वसन झाले, अनेक योजना आल्या आणि गेल्या. परंतु बारमाही रस्तेसुद्धा होवू शकले नाही. धरणग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासनही हवेतच विरले.
पंचायत समिती सभापतींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी या पुनर्वसन वसाहतींना भेटी दिल्या. परंतु विकास मात्र झाला नाही. धरणग्रस्तांनी स्वप्रयत्नाने सिंचन करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. येथे मोठी समस्या म्हणजे विजेचा प्रश्न आहे. रस्ते निर्मितीच्या अनेक योजना असल्या तरीसुद्धा कोणत्याही योजनेशी ही मंडळी संलग्नीत नाही. प्रशासकीय यंत्रणा गावकऱ्यांना उपेक्षित ठेवले. या गावातील बहुसंख्य नागरिक आता पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशा औद्योगिक शहरांकडे कामासाठी निघून जात आहे. या भागातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुण आता शहरांकडे धाव घेत आहेत. माळपठार भागात धरण ऊराशी असताना शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. २४ तास वीज नाही की दळणवळणाच्या सोयी नाही. सधन शेतकरी आता निर्धन झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना संघटित करून उपसा सिंचन योजनेचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी शासन दरबारी लढा देणार असल्याचे सचिन नाईक यांनी सांगितले.

Web Title: Projected farmer, Desodhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.