विज्ञाननिष्ठ स्वतंत्र विचाराची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन
By Admin | Updated: January 24, 2015 23:02 IST2015-01-24T23:02:20+5:302015-01-24T23:02:20+5:30
माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन.

विज्ञाननिष्ठ स्वतंत्र विचाराची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन
यवतमाळ : माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन. आहे त्या परिस्थितीत चांगले जीवन जगण्याचा ध्यास हाच प्रबोधनाचा मूळ हेतू असतो. जोपर्यंत माणसाच्या मनात ‘का’ हा प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या जगण्याला माणूस म्हणून अर्थ प्राप्त होत नाही, असे प्रतिपादन प्रा.डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
येथे आयोजित डॉ. वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी ‘प्रबोधनाची अंतहीन प्रक्रिया’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. ते म्हणाले, आपल्या आयुष्यातील गुंता स्वत: सोडवावा लागतो. हा गुंता सोडविण्यासाठी कोणीतरी येणार, असा विचार मनात आला की मन पंगू होते, दुबळे होते. पृथ्वीवर आज ईश्वरशाहीची नाही तर लोकशाहीची गरज आहे. विचार करण्याची शक्तीच आपल्याला माणूस म्हणून प्रस्थापित करीत असते. विचारांची सत्ता प्रस्थापित होणे हा प्रबोधनाचा अर्थ आहे. या प्रबोधनाचे पहिले शिल्पकार महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले आहेत.
प्रबोधनाची प्रक्रिया कधीच थांबणारी नाही. माणूस दर क्षणी निर्माण होणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या पेशींमुळे नव्याने जन्माला येत असतो. एका जन्मात अनंत जन्म घेणे हाच पुनर्जन्म असतो. तो महावीर आणि गौतम बुद्धाने अनुभवला होता. पाश्चात्यांच्या अगोदर भारतात लोकायत, बुद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाचे प्रबोधन केले आहे. भारतीय आणि पाश्चात्य प्रबोधनाचे प्रतिबिंब भारतीय संविधानात पडलेले आहे. प्रबोधन ही माणसाची प्रकृती आहे, किंबहुना माणूस हाच प्रबोधनाचे प्रतिक आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, असे डॉ. मनोहर म्हणाले.
व्याख्यानापूर्वी आचार्य पदवी विभूषित डॉ. कल्पना पांडे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. घनश्याम दरणे, परिचय डॉ. रमाकांत कोलते यांनी तर आभार प्रा. कमल राठोड यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)