प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:48 IST2019-02-06T23:47:28+5:302019-02-06T23:48:35+5:30
दारव्हा मार्गावरील भोयर घाटात स्टोन क्रशरचा मोठा खड्डा आहे. त्यातील पाण्यात मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. याची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याच खड्ड्यात तरुणाचाही मृतदेह आढळून आला. प्रेमीयुगुलाने हात बांधून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.

प्रेमीयुगुलाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारव्हा मार्गावरील भोयर घाटात स्टोन क्रशरचा मोठा खड्डा आहे. त्यातील पाण्यात मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. याची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याच खड्ड्यात तरुणाचाही मृतदेह आढळून आला. प्रेमीयुगुलाने हात बांधून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. चार दिवसांपासून हे दोघेही बेपत्ता होते.
दीपक सुरेश जाधव (२१) रा.कमलेश मंदिर परिसर लोहारा आणि नीकिता संजय गिरनाळे (१६) रा.इंदिरानगर वाघापूर असे मृत युगुलाचे नाव आहे. नीकिताचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी रविवारी दिली होती. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी अपहरण केल्याचा गुन्हाही दाखल केला होता.
दरम्यान, कुटुंबीय मुलीचा शोध घेत असताना त्यांना युवतीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी धाव घेतली असता तो नीकिताचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात आणखी शोध घेतला असता दीपकचा मृतदेह हाती लागला. घटनास्थळावर दोनही कुटुंबातील सदस्यांनी प्रचंड आक्रोश केला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. ठाणेदार सोनोने यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. दोनही मृतदेहाच्या डोळे व नाकाला मास्यांनी कुरतडल्याच्या जखमा होत्या. आत्महत्येपूर्वी दोघांनीही ओढणीने परस्परांचे हात बांधले होते. या घटनेने लोहारा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोनही मुला-मुलीच्या आई-वडिलांचा शोक पाहून अनेकांना गहिवरून आले होते.