अकाली पावसाचा पिकांना फटका

By Admin | Updated: January 4, 2015 23:21 IST2015-01-04T23:21:36+5:302015-01-04T23:21:36+5:30

ऐन हिवाळ्यात अचानक वातावरणातील बदल आणि जिल्ह्यात झालेला पाऊस यामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका संपली नसल्याचेच यातून दिसून आले.

The premature rain falls on the crops | अकाली पावसाचा पिकांना फटका

अकाली पावसाचा पिकांना फटका

यवतमाळ : ऐन हिवाळ्यात अचानक वातावरणातील बदल आणि जिल्ह्यात झालेला पाऊस यामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका संपली नसल्याचेच यातून दिसून आले.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक असमतोलामुळे मोठे संकट आले आहे. गारपीट, अतिवृष्टी आणि त्यानंतर मागील वर्षी खरिपात पावसाने दडी मारल्यामुळे दुबार व तिबार पेरणीचे संकट यातूनही शेतकऱ्यांनी सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यातच सोयाबीन व कापसावर विविध कीडींचा प्रादुर्भाव या सर्व संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही.
होते नव्हते सर्व काही गेल्यानंतर शेतकऱ्यांनी उसणवारी करून पुन्हा एकदा नव्या जोमाने रबी हंगामाची तयारी केली. त्यामध्ये गहू, हरभरा, आंबा, मिरची, भूईमूग आदींची लागवण करण्यात आली. यातून काही तर वाचेल आणि वर्ष कसेतरी निघेल ही अपेक्षा असताना अचानक गेल्या दोन दिवसांपूर्वी हिवाळ्यातच पावसाने हजेरी लावली. प्रचंड धुके आणि थंडावा यामुळे रबीच्या पिकांवर चांगलाच परिणाम झाला. आंब्याचा मोहर गळाला आहे. मिरचीवर रसशोषक कीडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मिरचीचेही उत्पादन चांगलेच घटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तुरीचे डबलबार पीक घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या वातावरणामुळे तो यशस्वी झाला नाही तर काहींनी तूर कापून ठेवली होती. त्यांना या पावसाचा फटका बसला. यावर्षी कापूस तोडायला मजूरही मिळेनासा झाला. अनेकांचा उरलासुरला व वाचलेला कापूस शेतात होता. हा कापूस ओला झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही गुंडाळल्या गेल्या.
अचानक वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या संकटाची समस्या सुरूच आहे. खरिपाच्या हंगामातील कोणतीही मदत अद्याप अनेकांपर्यंत पोहोचलीच नसताना हे नवे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. या दरम्यान सत्तांतर होवून विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात सर्वांचे डोळे नागपूरकडे लागले होते. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण काही निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु हिवाळी अधिवेशनात कोणतेही शेतकरी हिताचे निर्णय न घेतले गेल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. विशेषत: विदर्भात सर्वाधिक उत्पादित होणाऱ्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही कायमस्वरूपी लाभाचे निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु शासनाने यामध्ये शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. त्यानंतर आता रबी हंगामावर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाअपेक्षा धूळीस मिळाल्या आहेत. (शहर वार्ताहर)

Web Title: The premature rain falls on the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.