अकाली पावसाचा तडाखा
By Admin | Updated: January 1, 2015 23:08 IST2015-01-01T23:08:28+5:302015-01-01T23:08:28+5:30
नववर्षाचा सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच जिल्ह्यावर वरूण राजाने अवकृपा केली. धुव्वाधार अकाली पावसाने नऊ वर्षाच्या स्वागताची अनेकांची मजा तर किरकिरी केलीच, सोबतच रबी पिकांनाही

अकाली पावसाचा तडाखा
गारांचा वर्षाव : आर्णी तालुक्यात १९ मिमी पावसाची नोंद
यवतमाळ : नववर्षाचा सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच जिल्ह्यावर वरूण राजाने अवकृपा केली. धुव्वाधार अकाली पावसाने नऊ वर्षाच्या स्वागताची अनेकांची मजा तर किरकिरी केलीच, सोबतच रबी पिकांनाही मोठा फटका दिला. उमरखेड तालुक्यात गारांचा वर्षाव तर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सर्वाधिक पावसाची नोंद १९ मिमी आर्णी तालुक्यात झाली. अर्धे पुसद शहर अंधारात होते. दिवसभर ढगाळी वातावरणासह प्रचंड गारवा जाणवत होता. दुष्काळी परिस्थितीत या अकाली पावसाने आणखी भर घातली.
यवतमाळ शहरात रात्रभर ढगाळी वातावरण होते. पहाटे ६ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरींना प्रारंभ झाला. तब्बल तासभर जोरदार पाऊस कोसळला. त्यानंतर सकाळी १० वाजेपर्यंत रिमझिम पाऊस बरसत होता. नववर्षाच्या पहिल्या दिनकराचेही दर्शन शहरवासीयांना झाले नाही. वातावरणात प्रचंड गारवा जाणवत होता. उमरखेड तालुक्याला अकाली पावसाने अक्षरश: झोडपून काढले. ढाणकी, विडूळ, चातारी, ब्राम्हणगाव, दराटी, बिटरगाव या परिसरात जोरदार पाऊस झाला. तर कुपटी, पळशी, पोफाळी, मरसूळ या भागात गारपीट झाली. पळशी येथे गारपिटीत एक शेळी ठार झाली. सुपारी व लिंबाच्या आकाराच्या गारा झाल्या. यामुळे गहू, हरभरा पिकाला चांगलाच तडाखा बसला. दुपारपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. तहसील प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचे तलाठ्यांना आदेश दिले असून तालुक्यात १२ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे.
पुसद शहरासह तालुक्यात रात्री २.३० वाजताच्या सुमारास पाऊस कोसळला. तहसील कार्यालयाने १ मिमी पावसाची नोंद केली. नववर्षाचा जल्लोष साजरा करून नागरिक रात्री घरी परतत असताना आकाशात काळे ढग जमा झाले. विजांच्या कडकडाटात २.३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. तालुक्यात कुठेही नुकसान झाले नसल्याचे नायब तहसीलदार देवानंद धबाले यांनी सांगितले. या अकाली पावसाने वीज वितरण केंद्रातील डिक्स इन्शुलेटर फेल झाल्याने अर्धे अधिक शहर अंधारात होते. तब्बल नऊ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री २.३० वाजता खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत होण्यास दुपारचे १२.३० वाजले.
महागाव तालुक्यात रात्री १ वाजताच्या सुमारास पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे काही मार्गावरील वृक्ष उन्मळून पडली. वीज तारांवर वृक्ष कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. दिग्रस, नेर, कळंब, बाभूळगाव, आर्णी, दारव्हा या तालुक्यांनाही पावसाने जबर फटका दिला. आर्णी तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक १९ मिमी पावसाची नोंद झाली असून दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. (लोकमत चमू)