महागड्या बियाण्याने बळीराजा चिंतातूर
By Admin | Updated: June 20, 2014 00:06 IST2014-06-20T00:06:35+5:302014-06-20T00:06:35+5:30
अतिवृष्टी व गारपिटीमुळे नेस्तनाबूत झालेल्या बळीराजाला बियाण्याच्या वाढत्या महागाईची चिंता सतावू लागली आहे. नापिकने त्रस्त झाल्यामुळे त्यातच बियाण्याचे भाव वाढल्याने पेरणी करायची कशी,

महागड्या बियाण्याने बळीराजा चिंतातूर
दीपक वगारे - महागाव कसबा
अतिवृष्टी व गारपिटीमुळे नेस्तनाबूत झालेल्या बळीराजाला बियाण्याच्या वाढत्या महागाईची चिंता सतावू लागली आहे. नापिकने त्रस्त झाल्यामुळे त्यातच बियाण्याचे भाव वाढल्याने पेरणी करायची कशी, असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागत पूर्ण केली आहे. त्यांना मृगाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. यंदा खरिपाची पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने आपला माल विकावा लागला. यंदा मात्र बियाण्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे हे महागडे बियाणे कसे विकत घ्यायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
एकीकडे शेतकरी नापिकीचा सामना करत असताना बँक मात्र पीक कर्जाचे पुनर्गठण करायला तयार नाही. जुने थकीत कर्ज न दिल्यामुळे नवीन कर्ज देताना बँका शासकीय नियमांचा आधार घेत आहे. पीक कर्ज मिळण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा यंदाचा खरीप हंगामही धोक्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आता खासगी सावकाराकडे कर्जासाठी धाव घेतली आहे. महागाव परिसरात अनेकांनी खासगी सावकारीचा व्यवसाय सुरू केला आहे. कर्जाच्या बदलीत शेतकऱ्यांकडून गहाण खत करून घेण्यात येत आहे. अव्वाच्या सव्वा व्याज दर असलेले हे सावकारी कर्ज शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. असे असतानाही बँक मात्र आपल्या आडमुठ्या धोरणावर कायम आहे. एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पीककर्जाचे पुनर्गठण होत नसल्यामुळे आता कृषी केंद्र संचालकाकडूनच सावकारी पद्धतीने शेतकऱ्यांना बियाणे घ्यावे लागत आहे. पेरणीची वेळ येवून ठेपली असूनही बँका पीककर्ज द्यायला तयार नाही. त्यामुळे बँक प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला जात आहे.