उत्तम पिकांना विजेचा ‘शॉक’

By Admin | Updated: September 7, 2015 02:19 IST2015-09-07T02:19:11+5:302015-09-07T02:19:11+5:30

पाच वर्षात कधी नव्हे ते यंदा पिकांची स्थिती उत्तम आहे. मात्र अशा स्थितीत वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाचा ‘शॉक’ पिकांना बसत आहे.

Powerful Shock for Great Crops | उत्तम पिकांना विजेचा ‘शॉक’

उत्तम पिकांना विजेचा ‘शॉक’

यवतमाळ : पाच वर्षात कधी नव्हे ते यंदा पिकांची स्थिती उत्तम आहे. मात्र अशा स्थितीत वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाचा ‘शॉक’ पिकांना बसत आहे. शेतशिवारात पाण्याने भरलेल्या विहिरी असताना अघोषित भारनियमनाने ओलित करणे अशक्य झाले आहे. रात्ररात्र जागूनही ओलित करणे शक्य होत नसल्याने संतप्त शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकत आहे. त्यानंतरही कोणत्याच ठोस उपाययोजना होत नसल्याने दोन लाख हेक्टरवरील पीक करपण्याची भीती आहे.
जिल्ह्यातील कृषी फिडरवर सध्या १६ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. आठ तास वीज पुरवठा करण्याचा वितरण कंपनीचा दावा आहे. प्रत्यक्षात मात्र दोन तासही वीज मिळणे कठीण झाले आहे. यामुळे ओलित करणे अवघड झाले आहे. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतांमध्ये सिंचन करणे अवघड झाले आहे. परिणामी सुस्थितीत असलेले पीक करपणे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप दिसत असून गावागावातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेत आहे. त्यानंतरही आपला कारभार वीज वितरणने सुधारला नाही.
पावसाने दडी मारल्याने शेतकरी सिंचनाची सुविधा असलेल्या ठिकाणी ओलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु कृषी पंपावर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत आहे. दोन तासही वीज मिळत नसल्याने अनेक शेतकरी रात्री-बेरात्री शेतात जाऊन ओलित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
जिल्ह्याच्या काही भागात तीन दिवस दिवसा तर तीन दिवस मध्यरात्रीच्या सुमारास वीज पुरवठा होतो. या वेळात वीज पुरवठा खंडित होत नाही म्हणून रात्रीच्या वेळी शेतकरी जागून ओलित करतात. परंतु एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वीज पंप सुरू होत असल्याने तेही कधी बंद पडेल याचा नेम नसतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील वीज जोडण्या आणि सिंचन विहिरीकडे तातडीने लक्ष घातले आहे. परंतु कारभार मात्र सुधारल्याचे दिसत नाही. ८४ हजार कृषी पंपावर दोन लाख हेक्टर सिंचन केले जाते. परंतु आता भारनियमनामुळे ओलितच होत नाही. (शहर वार्ताहर)
वीज वितरण कंपनीच्या कारभाराने खरीप हंगाम उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहे. बाभूळगाव, घाटंजी, नेर, दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या कार्यालयावर धडक दिली. दिवसभर वीज पुरवठा करण्याची मागणी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन वीज वितरणला देऊन रोष व्यक्त केला. परंतु उपयोगच होत नाही. दारव्हा तालुक्यातील लाडखेड उपकेंद्रांतर्गत येणारी डीपी तीन वर्षांपासून बंद आहे. वारंवार निवेदने देऊनही दुरुस्ती मात्र झाली नाही.
पालकमंत्री संजय राठोड यांनी नेर तालुक्यातील चिखली येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. १५ मे रोजी आयोजित या दरबारात शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मरचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी वीज वितरणने तीन दिवसात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता चार महिने झाले तरी ट्रान्सफार्मर बसविण्यात आले नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा शेतकऱ्यांनी वीज वितरणवर धडक देऊन आपला रोष व्यक्त केला. त्यांना पुन्हा तीन दिवसाचे आश्वासन देण्यात आले.
पाऊस नसल्याने विजेची मागणी अचानक वाढली आहे. एकाच रोहित्रावर अनेक जोडण्यात आहेत. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. मात्र हा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून वेळापत्रकानुसारच वीज पुरवठा केला जात आहे.
- विजय भटकर
अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी.

Web Title: Powerful Shock for Great Crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.