शेती पिकाला रात्रीच वीज पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:16 IST2018-08-05T22:14:56+5:302018-08-05T22:16:04+5:30
एकीकडे कृषी फिडरवर १८ तासांचे भारनियमन लादून दुसरीकडे तीन दिवस केवळ मध्यरात्रीच वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रात्री अपरात्री शेतात ओलित कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

शेती पिकाला रात्रीच वीज पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एकीकडे कृषी फिडरवर १८ तासांचे भारनियमन लादून दुसरीकडे तीन दिवस केवळ मध्यरात्रीच वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रात्री अपरात्री शेतात ओलित कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
राज्याचे ऊर्जा मंत्री विदर्भाचे आहे. त्यातही ऊर्जा राज्यमंत्री तर यवतमाळचेच आहे. विदर्भात वीज निर्मिती होत असूनही विदर्भाच्याच शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज पुरवठा केला जात नाही. कृषी उत्पादन वाढविण्यासाठी सिंचन सुविधा आणि पूर्ण वेळ वीज हवी अशी मागणी शेतकरी वारंवार करीत असूनही दुर्लक्ष केले जात आहे.
यावर्षी शेतकऱ्यांनी सहा हजार शेततळे केले आहे. जिल्ह्यात ८२ हजार सिंचन विहिरी आहेत. त्यात पाणीही उपलब्ध आहे. तरीही ओलित करण्यासाठी वीज पुरवठाच उपलब्ध नाही. वीज वितरण कंपनीच्या वेळापत्रानुसार आठवड्यात तीन दिवस सकाळी ८.१० ते सायंकाळी ४.१९ पर्यंत वीज पुरवठा मिळणार आहे. तर उर्वरित तीन दिवस रात्री ११ ते सकाळी ८ पर्यंत वीज पुरवठा केला जाणार आहे. रविवारी कृषी फिडर पूर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे शासकीय सुटी विचारात घेऊन आणि भारनियमनाचे वेळापत्रक तपासून शेतकऱ्यांना रात्रीबेरात्रीच ओलित करावे लागणार आहे.
शेतकऱ्यांच्या संरक्षणाची हमी घेणार का?
वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना ओलितासाठी मध्यरात्री वीज पुरवठा करणार आहे. त्यामुळे रात्री दरम्यान शेतशिवारात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला श्वापदांचा धोका आहे. त्यांच्या जीविताच्या संरक्षणाची जबाबदारी वीज वितरण कंपनी घेणार का असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.