नापिकीमुळे पशूधन विक्रीला
By Admin | Updated: January 1, 2015 23:09 IST2015-01-01T23:09:55+5:302015-01-01T23:09:55+5:30
घाटंजीचा बैल बाजार जिल्ह्यासह परजिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. सध्या या बैलबाजारात विक्रीसाठी आणलेल्या पशुंची मोठी गर्दी आहे. परंतु पशुंच्या या गर्दीला शेतकऱ्यांच्या दु:ख व अगतिकतेची

नापिकीमुळे पशूधन विक्रीला
सुधाकर अक्कलवार - घाटंजी
घाटंजीचा बैल बाजार जिल्ह्यासह परजिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. सध्या या बैलबाजारात विक्रीसाठी आणलेल्या पशुंची मोठी गर्दी आहे. परंतु पशुंच्या या गर्दीला शेतकऱ्यांच्या दु:ख व अगतिकतेची झालर आहे. नापिकी व कर्जबाजारिपणामुळे शेतकऱ्यांकडे दमडीही शिल्लक नाही. त्यामुळे जीवापेक्षाही जपलेल्या या पशुधनाला जड अंतकरणाने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बैलबाजारात आणले.
सततची नापिकी आणि यावर्षी असलेली दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. अंगावरील बँका व सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, घरातील मुलामुलींचे विवाह कसे करायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असे विविध प्रश्न त्याच्या मनात काहूर माजवताहेत. शिवाय पाण्याचे स्त्रोत आतापासूनच नष्ट झाले असून वैरणाची समस्या निर्माण झाली आहे.
नुकतेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनापासून विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु शेतकरी हिताचा कोणताही ठोस निर्णय न झाल्याने व आता रबीतूनही फारकाही वाचेल असे वाटत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पाळलेले जनावरे आता विक्रीसाठी बाजारात आणली आहे. उल्लेखनिय म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पाळलेली ही जनावरे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे झाली आहे. यातून कसाबसा आपला व्यवहार भागवायचा, मुला-मुलींचे लग्नकार्य करायचे आणि पैसे उरल्यास पुन्हा शेतीला लावायचे, असे चक्र शेतकऱ्यांनी ठरविले आहे. शेतकऱ्यांचा अशा प्रकारचा मानस असला तरी बाजारातील वाढलेली आवकसुद्धा त्यांच्या अंगलट आली आहे. जो भाव त्यांना मिळायला पाहिजे तो येथे मिळताना दिसत नाही. त्यामुळे येथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. अनेक शेतकऱ्यांची मुले शेतकऱ्यांना विचारतात की तुम्ही बैल विक्रीस काढले मग आपण शेती कशी करायची. परंतु परिस्थितीची जाण त्या मुलांना नसल्यामुळे शेतकऱ्यांकडेही काय उत्तर द्यावं हा प्रश्नच आहे. त्याबाबतचा विचार आजच केल्यास त्याचा संपूर्ण व्यवहार ठप्प पडणार असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी अत्यल्प उत्पन्न झाले असून लागलेला खर्चही निघाला नाही. ज्या अटीवर आपण व्यवहार केला आहे त्याचे पैसे फेडायचे कसे, घरात धान्याचा दाणा नाही, उदरपोषण करायचे कसे, अखेर जनावरे विकून काही तरी ओझे हलके होईल, असे वाटून आम्ही आजवर जपलेली ही जनावरे बैलबाजारात विक्रीस आणल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भविष्यात काय समस्या येईल याबाबत विचार करण्यापेक्षा आजचा विचार केल्याने हा निर्णय घेतला आहे. काही शेतकऱ्यांनी तर जीवापाड घरातील सदस्यांप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना विकण्याची इच्छा नसताना नाईलाजाने विकावे लागत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांप्रती भरीव मदत जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्यातील सत्तांतरानंतर नवीन सरकार तारेल काय, नाही म्हणायला काँग्रेसने दुष्काळात शेतकऱ्यांना अनेकदा भरीव मदत केली आहे. नवीन सरकारनेसुद्धा काँग्रेसचा कित्ता गिरवित शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच नापिकी व कर्जबाजारीपणावर कायमस्वरूपी उपाय योजावेत, अशी अपेक्षा घाटंजीच्या बैलबाजारात पशुधन विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.