लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा (जि. यवतमाळ) : ज्यांच्या खांद्यावर नागरिकांचा विश्वास आणि महत्त्वाची कागदपत्रे पोहोचवण्याची जबाबदारी आहे, त्याच डाक विभागाने पांढरकवडात विश्वासार्हतेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. येथील पोस्टमन सतीश धुर्वे याने कर्तव्यात कसूर करून शेकडो नागरिकांचे टपाल आपल्या घरी साठवून ठेवल्याचे समोर आले आहे. 'लोकमत'ने या संदर्भात मंगळवारी वृत्त देताच, डाक विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. संबंधित पोस्टमनच्या घरातून टपालाने भरलेली तब्बल तीन पोती ताब्यात घेण्यात आली आहेत.
कायदेशीर नोटिसाही मिळत नव्हत्या
येथील ज्येष्ठ विधिज्ञ गाजी इबादुल्ला खान यांनी तक्रार केली होती. मागील एक वर्षापासून त्यांना मिळणारी कायदेशीर पुस्तके, नोटीस आणि इतर टपाल मिळत नव्हते. चौकशी केली असता, पोस्टमन सतीश धुर्वे हे टपाल वितरित न करता ते नष्ट करत असल्याचा त्यांना संशय आला. २२ डिसेंबर रोजी धुर्वे कार्यालयात गैरहजर असताना, त्यांच्या उद्धट वर्तणुकीमुळे हा संशय बळावला.
नागरिकांच्या आयुष्याशी खेळ
पोस्टमनच्या या कृत्यामुळे अनेक तरुणांची नोकरीची कॉल लेटर्स, वृद्धांचे पेन्शन पेपर आणि व्यापाऱ्यांचे धनादेश रखडले असण्याची शक्यता आहे. या गंभीर गुन्ह्यासाठी संबंधित पोस्टमनवर फौजदारी कारवाई करण्याची आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
घराची घेतली झडती: तक्रारीनंतर पोस्टमन सतीश धुर्वे
त्याच्या घराची झडती घेण्यात आली. मागील दोन वर्षापासूनचे नागरिकांचे आधार कार्ड, एलआयसी पॉलिसी कागदपत्रे, बँकेचे एटीएम आणि क्रेडिट कार्ड, महत्त्वाची कायदेशीर पत्रे अशा साहित्याने भरलेली तीन मोठी पोती ताब्यात घेण्यात आली.
पोस्टमास्तरची अरेरावी
या गंभीर प्रकरणावर प्रभारी पोस्टमास्तर अमोल पातोळे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी गेले असता, त्यांनी चक्क अरेरावी केली. पातोळे यांनी माहिती देण्यास नकार देत उलट पत्रकारांशीच हुज्जत घातली.'तुम्ही विनापरवानगी आत कसे आला? आमचा वेळ वाया घालवलात, आम्ही तुमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करू,' अशी धमकीवजा उत्तरे त्यांनी दिली. माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे सांगूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
Web Summary : A postman in Pandharkawda hoarded undelivered mail, including job letters and legal notices, at his home. Three bags of mail were seized. The postmaster acted rudely when approached for comment. An investigation is underway following the discovery.
Web Summary : पांढरकवड़ा में एक डाकिया ने नौकरी के पत्रों और कानूनी नोटिस सहित बिना वितरित डाक को अपने घर में जमा किया। डाक की तीन बोरियाँ जब्त की गईं। टिप्पणी के लिए संपर्क करने पर पोस्टमास्टर ने बदतमीज़ी की। खोज के बाद जांच चल रही है।