पोस्टल ग्राऊंडच्या दुकानांचे डिपॉझिट १३ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 03:53 IST2015-09-02T03:53:40+5:302015-09-02T03:53:40+5:30

महिला बचत गट, लघु उद्योग समूह यांच्या साहित्याला मार्केट उपलब्ध व्हावे या हेतूने पोस्टल ग्राऊंडवर दुकान गाळे

Postal Ground Shop Deposits 13 Lakhs | पोस्टल ग्राऊंडच्या दुकानांचे डिपॉझिट १३ लाखांवर

पोस्टल ग्राऊंडच्या दुकानांचे डिपॉझिट १३ लाखांवर

यवतमाळ : महिला बचत गट, लघु उद्योग समूह यांच्या साहित्याला मार्केट उपलब्ध व्हावे या हेतूने पोस्टल ग्राऊंडवर दुकान गाळे बांधण्यात आले. परंतु त्यासाठी तब्बल पाच ते १३ लाखांपर्यंत डिपॉझिट (अनामत रक्कम) ठेवण्याची प्रशासनाची तयारी बघता गावागावांतील महिला बचत गट यातून आत्ताच बाद होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
जिल्हा विकास निधीतून पोस्टल ग्राऊंडचा विकास केला जात आहे. याच ग्राऊंडवर दरवर्षी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आत्मा व अन्य सामाजिक संस्थांमार्फत महिला बचत गटाद्वारे निर्मित साहित्याचे प्रदर्शन भरविले जाते. तेथेच साहित्याची विक्री केली जाते. शिवाय त्यांना या प्रदर्शनातून मार्गदर्शनही केले जाते. वर्षातून केवळ तीन दिवस प्रदर्शनात आपले साहित्य विक्रीसाठी ठेवणाऱ्या या महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने त्याच पोस्टल ग्राऊंडवर दुकानांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यानुसार किमान ९० चौरस फूट आणि कमाल २५० चौरस फूट आकाराची २६ दुकाने बांधण्यात आली. सुरुवातीला या दुकानांना नगररचना विभागाची परवानगीच नव्हती. मात्र ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यानंतर कुठे नगररचना विभागाने परवानगी दिली. ही दुकाने बांधून तयार आहे.
मात्र तेथे प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नाही. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या दुकानांसाठी समिती आहे.
नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे. नगररचना विभागाने या दुकानांचे भाडे आणि अनामत रक्कम किती असेल याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार जास्तीत जास्त १३ लाख आणि कमीत कमी साडेपाच लाख रुपये अनामत रक्कम या दुकानांसाठी घेण्याचा प्रस्ताव आहे. ९० चौरस फुटाच्या दुकानासाठी पाच लाख रुपये डिपॉझिट आणि मासिक ९५० रुपये भाडे प्रस्तावित आहे. तर आकाराने सर्वात मोठे असलेल्या २६० चौरस फुट दुकानासाठी १३ लाख २५ हजार रुपये अनामत रक्कम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
विशेष असे या दुकानांसाठी फिल्डींग लावून असलेल्या व्यापाऱ्यांची शहरात आधीच मोठमोठ्ठाली दुकाने आहेत. गोरगरीब बचतगटाद्वारे निर्मित साहित्याला मार्केट मिळावे या हेतूने ही दुकाने काढली गेली असली तरी अनामत रक्कमेचा फुगविलेला आकडा पाहता त्या हेतूलाच मुठमाती दिली जात असल्याचे दिसून येते. २६ पैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग यांच्यासाठी प्रत्येकी एक दुकान आरक्षित ठेवले गेले आहे. या सर्व दुकानांची लवकरच बोली लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

४आकाराने अगदी लहान असलेल्या या दुकानांसाठीच्या अनामत रकमेचा आकडा पाहता गोरगरीब बचत गटांना या दुकानांपासून कोसोदूर ठेवण्याचा डाव असल्याचे दिसून येते. ५० हजार रुपये वार्षिक उलाढाल असलेले महिला बचतगट एवढे डिपॉझिट आणणार कोठून हा प्रश्न आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी मोक्याच्या जागेवर असलेली ही दुकाने व्यापाऱ्यांच्या घशात जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Postal Ground Shop Deposits 13 Lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.