गरिबांचे पैसे पाण्यात

By Admin | Updated: September 4, 2015 02:28 IST2015-09-04T02:28:48+5:302015-09-04T02:28:48+5:30

निढळाचा घाम गाळून दोन वेळच्या जेवणाची सोय करणाऱ्यांना सध्या अर्धी कमाई शुद्ध पाण्यासाठी खर्च करावी लागत आहे.

Poor money in water | गरिबांचे पैसे पाण्यात

गरिबांचे पैसे पाण्यात

स्पर्धा ‘टार्गेट’ची : थोपविले जात आहे महागडे यंत्र
यवतमाळ : निढळाचा घाम गाळून दोन वेळच्या जेवणाची सोय करणाऱ्यांना सध्या अर्धी कमाई शुद्ध पाण्यासाठी खर्च करावी लागत आहे. अशुद्ध पाण्यातून विविध आजार वाढत आहे. याच संधीचे सोने करीत वॉटर फिल्टर विक्रेत्यांकडून महागडी उपकरणे गरिबांच्या माथी मारली जात आहे.
शहरात जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी, तो बऱ्याच भागात एक दिवसाआड होतो. ही बाब टाळण्यासाठी अनेकांनी आपल्या अंगणात बोअरवेल केली आहे. अशा प्रत्येक घरी महागडे वॉटर फिल्टर बसविले गेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते योग्यही आहे. परंतु, मुळात शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना नागरिकांना महागडे यंत्र खरेदी करावे लागत आहे. श्रीमंतांना ही हौस परवडते. परंतु, आता गरिबांना गरज आणि ऐपत नसतानाही हा खर्च करावा लागत आहे.
विविध कंपन्यांचे वॉटर फिल्टर यंत्र विकण्यासाठी शहरात स्पर्धाच सुरू झाली आहे. ग्राहक वाढविण्यासाठी विक्रेत्यांनी एजंट नेमले असून हे एजंट ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी शहर पिंजून काढत आहेत. दुसऱ्या एजंटच्या तुलनेत आपली कामगिरी उजवी ठरावी यासाठी आता ज्यांची ऐपत नाही, अशाही कुटुंबांमध्ये जाऊन वॉटर फिल्टर माथी मारले जात आहेत.
दोन वेळच्या जेवणासाठी आॅटोरिक्षा चालविणे, बांधकाम मजूर म्हणून राबणे, शेतमजुरीला जाणे अशी कामे करणाऱ्या गरीब नागरिकांनाही चक्क १५ हजार रुपयांचे जलशुद्धीकरण यंत्र विकले जात आहे. यात अप्रत्यक्षपणे जबरदस्तीच केली जाते. हे एजंट एकाच गरीब ग्राहकाच्या घरी दिवसातून दोन वेळा, आठवड्यातून चार वेळा जातात. तरीही ग्राहक न मानल्यास त्याला दररोज फोन केला जातो. तरीही ग्राहक तयार होत नसेल तर त्याला इन्स्टॉलमेंटची योजना दिली जाते. साहजिकच ऐपत नसलेला ग्राहकही या योजनेला भुलतो. १ हजार रुपये नगदी देऊन १५ ते १६ हजार रुपयांचे यंत्र घेतो. दर महिन्याला ६ ते ७ हजार रुपये कमावणारा हा ग्राहक हजार दीड हजार रुपयांची इन्स्टॉलमेंट भरतो. वास्तवात गरीब ग्राहक पाणी केवळ उकळूनही शुद्ध करू शकतो. पण एजंटच्या जबरदस्तीपायी त्यांना दरमहिन्याला हजार दीड हजार खर्च करण्याची वेळ येत आहे. मुळात शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी पालिका, प्राधिकरण, ग्रामपंचायत यांची आहे. मात्र, त्यांच्यावर नागरिकांचा आता विश्वास उरलेला नाही. याचाच गैरफायदा आता विक्रेत्यांनी घेतला आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)
शुद्ध पाण्यासाठी सोपे उपाय
पाण्याची शुद्धता राखण्यासाठी १५ ते २० हजारांचा वॉटर फिल्टरच आवश्यक नसतो. काही घरगुती उपाय करूनही पाणी सहज शुद्ध ठेवले जाऊ शकते. साधे उकळून थंड केलेले पाणीही आरोग्याच्या दृष्टीने पुरेसे शुद्ध होते. पाण्यात तुरटीचा तुकडा टाकून ठेवल्यासही शुद्ध पाणी मिळते. शिवाय, औषधी दुकानात अत्यल्प किमतीत मिळणारे जीवनड्रॉप टाकूनही पाणी सहज शुद्ध केले जाऊ शकते. शिवाय दर दोन तीन महिन्यांनी वॉटर फिल्टर दुरुस्त करण्याचा त्रासही यातून टळू शकतो.
बिल्डरवर कारवाईची गरज
विशेषत: लगतच्या अनेक ग्रामपंचायतींच्या परिसरात कित्येक नव्या वसाहती उभ्या झाल्या आहेत. येथे पाण्याच्या शोधात घरोघरी बोअरवेल केल्या गेल्या आहेत. हे पाणी क्षारयुक्त असल्याने या परिसरावर वॉटर फिल्टर विक्रेत्यांचा डोळा आहे. घरे विकताना बिल्डरने ग्राहकांना शुद्ध पाण्याची हमी दिलेली असते. मात्र, नंतर नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाते. नव्या वसाहतींमधील नागरिकांना ना प्रशासन शुद्ध पाणी पुरवत ना बिल्डर. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची गरज आहे.
गरजेची वस्तू बनली स्टेटस् सिम्बॉल
वॉटर फिल्टर ही आरोग्यासाठी गरजेची वस्तू आहे. पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी या यंत्राचा चांगला उपयोग होतो. परंतु, हे यंत्र विकणारे एजंट ग्राहकांच्या घरी जाऊन घरी वॉटर फिल्टर असणे म्हणजे स्टेटस् सिम्बॉल असल्याचे भासवतात. अनेक गृहिणींचाही तसाच समज होतो. त्यातून ऐपतीपेक्षाही जादा किमतीचे यंत्र खरेदी केले जात आहे. हा पूर्णत: वैध व्यवहार असला तरी, विक्रेते व एजंटच्या शाब्दिक भुलभुलैयामुळे गरिबांना गरज नसताना खर्च करावा लागत आहे.

Web Title: Poor money in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.