यवतमाळची पूजा भेंडारकर करणार कॉमनवेल्थमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:35 IST2025-10-27T15:32:55+5:302025-10-27T15:35:59+5:30
Yavatmal : वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर पूजा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. अंतिम वर्षाला असताना पूजाच्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नाला यश आले.

Pooja Bhendarkar from Yavatmal will represent India in the Commonwealth
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील सर्वसामान्य कुटुंबातील बीएएमएस पदवी घेतलेल्या डॉ. पूजा संजय भेंडारकर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. कॉमनवेल्थ यूथ पीस अॅम्बेसेडर नेटवर्क लंडन यांच्या माध्यमातून ५६ देशांचे संघटन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून २०२५-२०२७ या कालावधीसाठी पूजा यांची निवड झाली आहे.
वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर पूजा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. अंतिम वर्षाला असताना पूजाच्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नाला यश आले. तिने कॉमनवेल्थ सेक्रेटरिएट लंडन यांच्याकडे तीन विषयातील लेखी सादरीकरण केले. त्यापैकी मेडिकोलिगल पीस नेक्सेस याची निवड झाली. त्यानंतर पूजा हिची कठोर मुलाखत घेण्यात आली. प्रोफाईल पडताळणीपासून या प्रक्रियेची सुरुवात झाली होती. पूजाने औषधी आणि कायदा यातील आंतर समन्वय यावर सादरीकरण केले होते. यापूर्वी तिने गांधीनगर येथे गृहमंत्रालय दिल्ली यांच्या वतीने आयोजित नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटी येथील कार्यक्रमात आपली भूमिका मांडली होती.
या निवडीमुळे पूजाला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. तिच्या माध्यमातून १०० प्रशिक्षितांची चमू तयार केली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून महिला, तरुण व शालेय विद्यार्थी स्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. फेलोशिप देण्याचा अधिकार पूजाला मिळाला आहे. राष्ट्रकुल पातळीवर सहकार्य व संवाद वाढविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. २५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत मलेशिया येथे बोर्निओ इंटरनॅशनल सेंटर फॉर आर्बिट्रेशन अॅन्ड मेडिएशन हे प्रशिक्षण पूर्ण केले. यामुळे संवादाधारीत व संवेदनशील वाद निवारणाची क्षमता अधिक दृढ झाली असे डॉ. पूजा यांनी 'लोकमत'ला सांगितले. तिच्या वाटचालीत वडील संजय, आई वैजयंती यांचे मार्गदर्शनही महत्त्वपूर्ण राहिले आहे.
डॉ. पूजा यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी
- राष्ट्रकुल पातळीवर ठसा उमटविणारी डॉ. पूजा भेंडारकर ही यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण येथेच पूर्ण केले.
- डा.मा.म. आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ येथून बीएएमएसची पदवी घेतली. नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली. तिची रुची कायद्याचे ज्ञान घेण्यात असल्याने तिने मुंबई येथील लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.