यवतमाळ पालिकेत राजकीय समझोता
By Admin | Updated: May 27, 2017 00:12 IST2017-05-27T00:12:00+5:302017-05-27T00:12:00+5:30
येथील नगरपरिषदेत भाजपविरूद्ध शिवसेना, असा संघर्ष पेटला असताना शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत

यवतमाळ पालिकेत राजकीय समझोता
स्थायी समिती : अर्ध्या तासात ७० विषय मार्गी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील नगरपरिषदेत भाजपविरूद्ध शिवसेना, असा संघर्ष पेटला असताना शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत मात्र सर्वंच विषय एकमताने मंजूर झाले. यामुळे आता नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या सभेत मागे दोनदा तहकूब झालेल्या सभेतील विषय तसेच नवीन विषय, अशा ७० विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. काही मिनिटांत हे विषय मंजूर झाले. त्यामुळे उशीरा का होईना, नगरसेवकांना विकास कामांची उपरती झाल्याचे दिसून आले. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या बैठकीत शहरातील अंतर्गत रस्ते आणि सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम, नेताजीनगरासाठी सार्वजनिक शौचालय बांधकामाचा मुद्दा चर्चेला आला. नंतर येथील रेल्वेच्या जागेत शौचालय बांधकाम प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या एका आदेशाचा आधार घेण्यात आला.
बैठकीत शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करून दिलेल्या दराप्रमाणे टॅँकर लावण्याचा ठराव पारित झाला. विंधन विहिरींवर सबमर्शीबल पंप बसवून नळावरून पाणी वितरित करण्यालाही मंजुरी दिली. बीओटी तत्वावर एलईडी लाईट बसविण्याला मान्यता दिली. दलितवस्ती सुधार योजनेतील तलावफैल, चमेडीयानगर, मिलींद सोसायटी, नेताजीनगर शाळेला संरक्षक भिंत, सुराणा ले आऊट, रविदासनगर, अंबिकानगर, मलन्नानगर, विटभट्टी परिसर, सेवानगर येथील विविध विकास कामांनाही सभेने एकमताने मंजुरी दिली.