पोलिसांच्या वॉरंट प्रवास विम्याला संरक्षण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:13 IST2018-03-15T12:13:37+5:302018-03-15T12:13:43+5:30
शासकीय कामानिमित्त पोलिसांचा वॉरंट प्रवास विमा संरक्षणाबाहेर फेकला गेला आहे. वॉरंटवरील प्रति प्रवाशामागे एक रुपया अपघात विमा निधी मिळत नसल्याने ‘एसटी’ने या दाव्यापासूनच पोलिसांना दूर ठेवले आहे.

पोलिसांच्या वॉरंट प्रवास विम्याला संरक्षण नाही
विलास गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासकीय कामानिमित्त पोलिसांचा वॉरंट प्रवास विमा संरक्षणाबाहेर फेकला गेला आहे. वॉरंटवरील प्रति प्रवाशामागे एक रुपया अपघात विमा निधी मिळत नसल्याने ‘एसटी’ने या दाव्यापासूनच पोलिसांना दूर ठेवले आहे. शिवाय पोलीस विभागाकडूनही यासाठी ठोस असे प्रयत्न झाले नाही. या व्यवहाराविषयी पोलिसांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
पोलिसांना शासकीय कामानिमित्तचा प्रवास ‘एसटी’नेच करावा लागतो. आरोपींना न्यायालयात घेऊन जाणे, मेडिकल, प्रशिक्षण, आरोपींचा शोध या कामांसाठी हा प्रवास घडतो. यासाठी पोलिसांच्या हाती रोख रक्कम दिली जात नाही. वॉरंट अर्थात कॅशलेस व्यवहार. पूर्वापार चालत आलेली ही पद्धत आहे. एखाद्या पोलिसाचे नाव आणि सोबत असलेल्या इतर व्यक्तींची संख्या वॉरंटवर लिहायची (अशोक + पाच) अर्थात सहा प्रवासी. वॉरंट दाखविला की, तिकीट फाटले आणि ते प्रवासी झाले.
मात्र ‘एसटी’ महामंडळाने सुरू केलेल्या ‘हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी’ योजनेत वॉरंटच्या प्रवाशाला दूर ठेवले गेले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक तिकीटामागे प्रवास भाड्याव्यतिरिक्त एक रुपया अधिक घेतला जातो.
प्रवास भाड्याचे शंभर रुपये आणि एक रुपया अपघात सहायता निधी असे एकूण १०१ रुपयांचे तिकीट प्रवाशाला दिले जाते. बसला अपघात होऊन प्रवाशाचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये त्याच्या कुटुंबाला महामंडळाकडून दिले जाते. मात्र यापासून वॉरंटवर प्रवास करणारे दूर ठेवण्यात आले आहे.
वॉरंटवर अपघात सहायता निधीची रक्कम नोंद केली जात नाही. पाच व्यक्तींची नोंद असल्यास प्रती प्रवासी १०० रुपये या प्रमाणे ५०० रुपयांचेच वॉरंट पास केले जाते. त्यावर पाच प्रवाशांमागे सहायता निधी घेतला जात नाही. निधीच घेतला जात नाही तर अपघात विम्याचे संरक्षण द्यायचे कसे, हा एसटीचा प्रश्न आहे. सरकारी कामासाठी प्रवास करीत असताना विमा संरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रकार पोलिसांना चांगलाच खटकला आहे. लोकवाहिनीकडून सर्व प्रवाशांना समान न्याय द्यावा, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.
‘शिवशाही’तही जागा नाही
वॉरंटवर प्रवास करणाऱ्यांना ‘शिवशाही’तही जागा दिली जात नाही. वास्तविक जेवढे तिकीट असेल तेवढे तिकीट वॉरंटवर घेता येते. परंतु शिवशाहीने वॉरंट स्वीकारणार नाही, असा जणू पणच केला आहे. शिवशाही सुरू केल्याने महामंडळाने लांबपल्ल्याच्या इतर बसेस बंद केल्या आहे. फेऱ्या कमी झाल्याने वॉरंटने प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागते. शिवशाही नेमक्या प्रवाशांना घेऊन जाते. पोलीस अधिकारी, कर्मचारी हतबल होऊन बसकडे पाहत उभे राहतात. ही गैरसोय पोलीस विभागाकडूनही दुर्लक्षित आहे.