वेदनेने विव्हळणाऱ्या वृद्धाला पोलीस अधीक्षकांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:01 IST2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:01:00+5:30
त्या वृद्धाला पोटदुखीचा त्रास असल्याने त्याने शनिवारी ११ एप्रिलला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडे दाखविले. मात्र तेथील डॉक्टरांनी या आजारावर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगून यवतमाळ सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. वाहन व पैसा नसल्याने या रुग्णाने पायदळ यवतमाळ गाठले. हे ऐकून जगदीश राठोड याने त्या वृद्धाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले.

वेदनेने विव्हळणाऱ्या वृद्धाला पोलीस अधीक्षकांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार शहरात पेट्रोलिंग करीत असताना वनवासी मारोती परिसरात एका वृद्धाने आर्त हाक दिली. हा आवाज ऐकून एसपी थांबले. त्यांनी रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या या वृद्धाची आस्थेने चौकशी केली व पुढे निघतानाच त्यांनी तेथे असलेल्या शिपायाला तातडीने योग्य ती मदत करण्याचे निर्देश दिले.
किशना उकांजी टोंगले (६०) रा. झिरपूरवाडी ता. दिग्रस हा वृद्ध सलग दोन दिवसांपासून दिग्रस येथून पोटदुखीची वेदना घेऊन पायदळ निघाला. या प्रवासात त्याला अन्नाचा कणही मिळाला नाही. उपाशी पोटी मजल दरमजल करीत यवतमाळ शहर गाठले. वनवासी मारोती परिसरात त्याच्या शरीरात त्राणही उरले नव्हते. तो रस्त्याच्या कडेला पडला. इतक्यात पोलिसांचे वाहन रस्त्यावरून जाताना दिसले. प्राण एकवटून त्याने मदतीसाठी हाक मारली. ही हाक ऐकून पोलीस अधीक्षकांनी त्याला मदत करण्याचे निर्देश दिले. शहर ठाण्यातील बीट मार्शल जगदीश राठोड हा तेथे होता. त्याने तत्काळ त्या वृद्धाला जवळ घेऊन जेवण व पाणी दिले. नंतर आस्थेने विचारपूस केली असता धक्कादायक वास्तव ऐकायला मिळाले. त्या वृद्धाला पोटदुखीचा त्रास असल्याने त्याने शनिवारी ११ एप्रिलला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडे दाखविले. मात्र तेथील डॉक्टरांनी या आजारावर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगून यवतमाळ सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. वाहन व पैसा नसल्याने या रुग्णाने पायदळ यवतमाळ गाठले. हे ऐकून जगदीश राठोड याने त्या वृद्धाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. काही मदत लागल्यास त्याबाबतही संपर्काची सोय करून दिली.