पोलीस पाटलाविना ६३४ गावांची सुरक्षा वाऱ्यावर
By Admin | Updated: December 27, 2014 22:59 IST2014-12-27T22:59:47+5:302014-12-27T22:59:47+5:30
गावाच्या सुरक्षेसोबत महसुलाची महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटलांच्या महत्वाच्या पदाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी एक हजार पोलीस पाटलांवर दोन हजार गावांची

पोलीस पाटलाविना ६३४ गावांची सुरक्षा वाऱ्यावर
यवतमाळ : गावाच्या सुरक्षेसोबत महसुलाची महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटलांच्या महत्वाच्या पदाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी एक हजार पोलीस पाटलांवर दोन हजार गावांची जबाबदारी आली आहे. विशेष म्हणजे जिल्हयातील ६२४ गावातील पोलीस पाटलांचे पद रिक्त आहेत. या गावाची जबाबदारी लगतच्या गावातील पोलीस पाटलांवर सोपविली आहे.
लोकशाही प्रणालीत पंचायतराज संस्थानला सर्वाधिक महत्व आहे. त्याची रचना करताना गावाची संपूर्ण जबाबदारी सरपंचावर सोपविण्यात आली आहे. तर गावाच्या शांततेची जबाबदारी पोेलीस पाटलांवर देण्यात आली आहे. यामुळे गावातील सर्वात महत्वाचे पद म्हणून पोलीस पाटलाचे पद मानले जाते. या महत्वाच्या पदालाच खिळखिळे करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पोलीस पाटलांना टीएडीएच्या नावाखाली वर्षभरासाठी केवळ २५ रुपये दिले जातात. यात जेवनाची आणि तिकीटाची व्यवस्था कशी करावी आसा प्रश्न पोलीस पाटलांना पडतो. शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यासा पोलिसांचे सहकार्य मागवावे लागते. मात्र यासाठी लागणारा दूरध्वनी खर्च पोलीस पाटलांना खिशातून करावा लागतो.
पोलीस पाटलाचा दाखला, इतर अर्ज आणि स्टेशनरी खर्च करण्यासाठी छदामही मिळत नाही. त्यांना दिले जाणारे मानधन मात्र तोकडेच आहे. याविरोधात पोलीस पाटलांनी आंदोलन छेडले मात्र त्यांना न्याय मिळालाच नाही. (शहर वार्ताहर)