अमरावती, आदिलाबादच्या टोळीवर पोलीस तपास केंद्रित
By Admin | Updated: July 2, 2014 23:27 IST2014-07-02T23:27:37+5:302014-07-02T23:27:37+5:30
येथील यवतमाळ महिला सहकारी बँकेतील दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांनी रेकॉर्डवरील आदिलाबाद व अमरावतीच्या टोळीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

अमरावती, आदिलाबादच्या टोळीवर पोलीस तपास केंद्रित
नेर : येथील यवतमाळ महिला सहकारी बँकेतील दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांनी रेकॉर्डवरील आदिलाबाद व अमरावतीच्या टोळीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
नेर येथे मंगळवारी रात्री बँकेवर दरोड्याचा प्रयत्न झाला. मात्र दरोडेखोरांना तिजोरीपर्यंत पोहोचता न आल्याने त्यातील ४२ लाख रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली. या गुन्ह्याचा नेर पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे. नेर पोलिसांना या प्रकरणात अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या आंतरराज्जीय गुन्हेगार सुरेश उमक याच्या टोळीवर संशय आहे. गॅस कटरने तिजोरी फोडणारी सुरेशची एकमेव टोळी महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमध्ये सक्रिय आहे. या टोळीचा तर यामध्ये हात नाही ना, ही शक्यता तपासली जात आहे. परंतु उमक टोळी सहसा शनिवार-रविवार पाहून बँकांमध्ये चोरी करते. ही चोरी मंगळवारी झाल्याने या टोळीचा हात नसावा, असा पोलिसांच्या अन्य एका तपास पथकाचा दावा आहे.
मात्र कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांना जेरबंद केले जाईल, असा विश्वास येथील पोलीस निरीक्षक शंकरराव शिंपीकर यांनी व्यक्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात आंध्रप्रदेश राज्याच्या आदिलाबाद येथील अशा एका टोळीवर तपास केंद्रीत केला आहे.
उपरोक्त दोनही टोळ्या पोलीस रेकॉर्डवर असून त्यांचा घटनेच्या वेळीचा ठावठिकाणा शोधला जात आहे. याशिवाय नेर तालुक्यातीलच काही निवडक गावांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. कारण या दरोड्यात आलेले अपयश लक्षात घेता ही टोळी नवखी असावी, असाही एक सूर पोलीस वर्तुळातून ऐकायला मिळत आहे.
या घटनेमुळे नेर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून कालपासून शहरात या धाडसी दरोड्याची चर्चा ठिकठिकाणी सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)