Poisoning of 20 farmers and farm laborers | २० शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा
२० शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा

ठळक मुद्देपिकांवरील फवारणी पुन्हा जीवावर उठतेय : आणखी ८१ रुग्ण, संख्या वाढतीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : २०१७ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २२ शेतकऱ्यांचा फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतरही फवारणी विषबाधेचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मागील दोन दिवसात २० जणांना विषबाधा झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ८१ जणांना विषबाधा झाली आहे.
शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सततच्या ढगाळी वातावरणामुळे दोन्ही पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादूर्भाव जाणवत आहे. शेतकऱ्यांना कीड नियंत्रणासाठी फवारणी केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. रासायनिक शेती होत असल्याने घातक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. कृषी विभाग शेतकऱ्यांना निंबोळी अर्क फवारण्याचा सल्ला देत आहे. मात्र याचा परिणाम किडींवर होत नाही. त्यामुळे घातक अशा कीटकनाशकांचे एक नव्हे तर तीन-तीन फवारण्या कराव्या लागत आहे. फवारणी करताना सुरक्षा कीट वापरणे व फवारणीबाबत अनेक तांत्रिक स्वरूपाची माहिती कृषी खात्यातील तज्ज्ञांकडून दिली जात आहे. कृषीतील फवारणीचे तंत्रज्ञान शेताच्या प्रात्यक्षिकात शक्य होणारे नाही, त्यामुळे अनेक भागात आजही परंपरागत पद्धतीनेच कीटकनाशक फवारणी होत आहे. यातूनच विषबाधेचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एकूण ८१ जणांना विषबाधा झाली असून वार्डात ३१ रुग्ण दाखल आहे.
नव्याने २० रुग्ण दाखल झाले. एकाची प्रकृती गंभीर असून त्याला कृत्रिम जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. सहा जणांनाही गंभीर स्वरूपात विषबाधा आहे. सुदैवाने वैद्यकीय महाविद्यालयात एकाचाही विषबाधेने मृत्यू झाला नाही. केवळ आर्णी तालुक्यातील एका शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. त्याची नोंद शासकीय रुग्णालयात नाही.

एकात्मिक कीड नियंत्रण प्रयोग संशयाच्या भोवऱ्यात
कृषी विभागाकडून एकात्मिक कीड नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. यात कृषी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग असतो. त्याउपरही सातत्याने पिकांवर किडींचा प्रादूर्भाव होत आहे. यावर्षी तर अळ्यांचे प्रमाण अनाकलनीय असे आहे. यामुळे कृषी विभागाचा कीड नियंत्रण प्रयोगच संशयाच्या भोवºयात आला आहे.

Web Title: Poisoning of 20 farmers and farm laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.