पांढरकवडा (यवतमाळ) येथील टिपेश्वर अभयारण्यात बुधवारी सकाळी सफारीदरम्यान एका पर्यटकाने काढलेल्या फोटोत वाघिणीच्या पायात तारेचा फास असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. यानंतर वन्यजीव विभागाला या घटनेची माहिती मिळाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गंभीर बाब अशी की, गेल्या महिनाभरात पायात फास अडकलेली ही तिसरी वाघीण आहे. यापूर्वी टिपेश्वर अभयारण्यात पी.सी. वाघिणीच्या गळ्यात फास अडकला होता. त्यानंतर लगेच मुकुटबन वनपरिक्षेत्रातील पवनार परिसरात टी-९ वाघिणीच्या गळ्यात फास अडकल्याची बाब पुढे आली होती.
टी-९ वाघिणीच्या गळ्यात अडकला होता फास
आठवडाभरापूर्वीच पीसी वाघिणीला उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले, तर टी-९ वाघिणीच्या गळ्यातील फास निघाला व तिची जखमही सुकल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आल्याने तिला ट्रॅन्क्युलाईज करण्याची मोहीम दोन दिवसांपूर्वीच थांबविण्यात आली.
बुधवारी टिपेश्वर अभयारण्यातील सितारा वाघिणीच्या पायात फास अडकल्याची बाब उघड झाली. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे वाघांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
पर्यटकाला फोटो बघताना दिसला फास
१० मार्च सोमवार रोजी पर्यटकांना सितारा वाघिणीने दर्शन दिले, त्यावेळी तिच्या पायात कोणत्याही प्रकारचा फास दिसून आला नाही. मंगळवारी टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असते. १२ मार्चला सकाळच्या सफारीदरम्यान एका पर्यटकाला फोटोमध्ये सितारा वाघिणीच्या समोरील पायाला तारेचा फास असल्याचे दिसून आले.
सितारा ही दीड वर्षाची आहे. आर्ची नामक वाघिणीने तिला जन्म दिला आहे. सितारा वाघिणीच्या पायात फास अडकला असला तरी तिला कोणत्याही प्रकारची जखम दिसून आली नाही. वनविभाग आता तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
वन्यजीव विभागाचा निष्काळजीपणा
टिपेश्वर अभयारण्यातील वाघांना फास लागण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. तसेच लहानमोठ्या कितीतरी वन्यजिवांची शिकार होत असेल याचा अंदाज न लावलेला बरा. यावरून टिपेश्वर वन्यजीव विभागाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे.
काही दिवस पूर्वीच पीसी वाघिणीलासुद्धा फास लागला होता. तो फास काढण्यासाठी वन्यजीव विभागाला एक महिना परिश्रम घ्यावे लागले. श्रेय घेण्याच्या शर्यतीत हा विलंब झाल्याची चर्चा आहे.
"वाघिणीच्या हालचालींवर सध्या लक्ष ठेवून आहोत. तिला लवकरात लवकर ट्रॅक्यूलाइज करून पायातील फास काढून मुक्त करण्यात येईल", असे पाढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांनी सांगितले.