मगर वो शख्स जमी पर खुदा का साया हैं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2015 05:05 IST2015-12-12T05:05:17+5:302015-12-12T05:05:17+5:30

जिसका कोई नही उसका तो खुदा हैं यारो... पण हा खुदाही अदृश्य नसतो. तो माणसांच्याच रूपात वावरत असतो.

But that person is in charge of Goddess Khuda ... | मगर वो शख्स जमी पर खुदा का साया हैं...

मगर वो शख्स जमी पर खुदा का साया हैं...

अनाथाचे आप्त : लाजवंतीचा विवाह ठरणार सद्प्रवृत्तीचे संमेलन
यवतमाळ : जिसका कोई नही उसका तो खुदा हैं यारो... पण हा खुदाही अदृश्य नसतो. तो माणसांच्याच रूपात वावरत असतो. अशा देवमाणसांच्या छत्रछायेतच शनिवारी एका अनाथ मुलीचा संसार उजवणार आहे. मुलीचे लग्न म्हणजे एक घर कायमचे सोडून दुसऱ्या घरात जाणे. पण अनाथ लाजवंती आयुष्यात पहिल्यांदा ‘घरात’ जाणार आहे. परिवारात जाणार आहे.
शनिवारी नंदूरकर महाविद्यालयाच्या प्रांगणात लाजवंतीच्या अनोख्या विवाहाचा समारंभ पार पडतोय. लाजवंती नावाची ही उपवर मुलगी अनाथ. पण शंकरबाबा पापळकर नावाच्या विभूतीने तिचे पितृत्व स्वीकारले. शंकरबाबांच्या वझ्झर (जि. अमरावती) येथील बालगृहात लाजवंती लहानाची मोठी झाली. तिच्यासारखेच आणखी १०० अनाथ जीव शंकरबाबांच्या पितृछायेत समृद्ध होत आहेत. या बालगृहातील १६ अनाथांचे विवाह शंकरबाबांनी मोठ्या थाटामाटात पार पाडले. आता लाजवंतीच्या विवाहासाठीही त्यांनी समाजातील सद्प्रवृत्तीला साद घातली अन् आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचा श्रीराम हा तरुण लाजवंतीच्या पुढच्या प्रवासाचा भागीदार बनला. लाजवंती आणि श्रीरामच्या विवाहासाठी यवतमाळातील सेवाभावी माणसांनी धाव घेतली. लोकमत सखी मंचच्या प्रमुख सीमा दर्डा यांनी लाजवंतीच्या हळद-मेहंदीच्या कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले. सखी मंचच्या सर्व सदस्यांनी गुरुवारी अत्यंत उत्साहाने लाजवंतीचे हात मेहंदीने सजविले. जिला आई नाही, अशा लाजवंतीचे अंतरंग ‘सखी’च्या सहवासाने फुलारून गेले. बोहल्यावर चढण्यापूर्वीची सर्वसामान्य तरुणीची उत्सुकता-हुरहुर काय असते, तिच्या भावविश्वात काय भाव उसळलेले असतात, हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणींचा मोठा गोतावळा पिंगा घालत असतो. अनाथ लाजवंतीच्या दिमतीलाही लोकमत सखी मंचाने ही हक्काची मैत्री दिली.
लाजवंतीच्या लग्नासाठीही समाज एकवटला आहे. नंदूरकर महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या विवाहात चक्क पालकमंत्री संजय राठोड लाजवंतीचे कन्यादान करणार आहेत. मामकूळ म्हणून प्राचार्य प्रकाश नंदूरकर जबाबदारी पार पाडणार आहेत. तर लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी मेहंदीच्या कार्यक्रमातून लाजवंतीला माहेर देऊ केले.
शंकरबाबांची लाडकी कन्या नवरी झाली. त्यांच्या बालगृहातील हा सतरावा विवाह समाजाला निश्चितच नवी समज देऊन जाणारा आहे. अनाथांचे बाबा होणारे शंकरबाबा पापळकर, त्यांच्या हाकेला ओ देणारे यवतमाळातील सदगृहस्थ अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाजवंतीचा जोडीदार म्हणून स्वीकार करणारा दिग्रसचा श्रीराम हे सारेच अभिनंदनाचे अधिकारी!
आपल्याला कुणीच नाही या भावनेशी आयुष्यभर झगडणारी लाजवंती शनिवारी हजारो नातेवाईकांच्या उपस्थितीत गृहिणी होतेय. बालपणीच आधार देणारे शंकरबाबा अन् आता आयुष्याचा सांगाती बनलेला श्रीराम यांच्याविषयी या नववधूच्या भावना कदाचित अशाच असतील...
ये और बात हैं के
इन्सान बन के आया हैं
मगर वो शख्स जमी पर
खुदा का साया हैं...

सामाजिक विवाह सोहळा आज
४शंकरबाबा पापळकरांची लाडाकौतुकाची लेक लाजवंती आणि दिग्रस येथील श्रीराम वसंतराव सरमोकदम यांचा सामाजिक विवाह सोहळा शनिवार १२ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता येथील डॉ. नंदूरकर विद्यालयात संपन्न होत आहे. पालकमंत्री संजय राठोड सपत्नीक कन्यादान करणार आहे. आंतरराष्ट्रीय गायक साईराम अय्यर आणि प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे यांच्या संगीत रजनीचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: But that person is in charge of Goddess Khuda ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.