युवा शेतकऱ्याने मागितली आत्मदहनाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 15:02 IST2020-09-23T15:00:11+5:302020-09-23T15:02:03+5:30
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतातील पाणी वाहून जाण्याची नाली बुजली. त्यामुळे शेतात साचून राहात असलेल्या पाण्यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तरोडा (ता.आर्णी) गावातील युवा शेतकऱ्याने आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.

युवा शेतकऱ्याने मागितली आत्मदहनाची परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतातील पाणी वाहून जाण्याची नाली बुजली. त्यामुळे शेतात साचून राहात असलेल्या पाण्यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तरोडा (ता.आर्णी) गावातील युवा शेतकऱ्याने आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.
नयनेश सुनील भोयर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे ३.५ एकर शेतजमीन आहे. या शेतातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ गेला आहे. या मार्गाच्या कामामुळे शेतातून पाणी वाहून जाण्याची नाली बंद झाली. पाण्याचा निचरा होत नाही. याशिवाय लगतच्या काही शेतातील पाणीही त्यांच्याच शेतात येऊन साचते.
नाली बंद झाल्याने शेतात पाणी साचून नुकसान होईल, ही भीती नयनेश भोयर याने उपविभागीय अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला एप्रिलमध्येच पूर्वसूचना देऊन व्यक्त केली होती. या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतकºयाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. नयनेशच्या वडिलांचे निधन झाले असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तो पार पाडत आहे. अडचणीतून मार्ग काढत असतानाच यावर्षी त्यांच्या पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.