प्रसादासाठी परवाना सक्तीचा
By Admin | Updated: August 19, 2014 23:58 IST2014-08-19T23:58:42+5:302014-08-19T23:58:42+5:30
कोणताही धार्मिक कार्यक्रम असो की उत्सव, प्रसाद वितरण आलेच. मात्र आता यापुढे कुणालाही सहज प्रसाद, महाप्रसादाचे वितरण करता येणार नाही. त्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाचा

प्रसादासाठी परवाना सक्तीचा
सण-उत्सव : धर्मदाय आयुक्तांकडे मंडळाची नोंदणी आवश्यक
यवतमाळ : कोणताही धार्मिक कार्यक्रम असो की उत्सव, प्रसाद वितरण आलेच. मात्र आता यापुढे कुणालाही सहज प्रसाद, महाप्रसादाचे वितरण करता येणार नाही. त्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाचा परवाना घ्यावा लागणार आहे. त्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात मंडळाची नोंदणी केल्यानंतर प्रसाद वितरणाचा परवाना मंडळाला मिळणार आहे. त्यासाठी १०० रूपयांचा खर्र्चही येणार आहे.
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून येणारा खवा, दुग्धजन्य पदार्थ यातून होणारी विषबाधा लक्षात घेता अन्न व औषधी प्रशासन विभागाने हे पाऊल उचले आहे. मुळात या प्रकारालाच आळा बसावा म्हणून नवा आदेश अन्न आणि औैैैषधी प्रशासन विभागात धडकले आहे. या आदेशानुसार मंडळाला प्रसाद वाटपासाठी परवाना देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रारंभी मंडळाला धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून मिळविलेला स्थापनेचा परवाना अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे सादर करावा लागणार आहे. यासोेबतच मंडळातील सदस्यांची नावे, मोबाईल क्रमांक आणि पत्ताही सादर करावा लागणार आहे. ज्या ठिकाणावरून प्रसाद खरेदी केला तेथील पक्के बिल, दुकानाचे नाव सादर करावे लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मंडळाला १०० रूपयांचा खर्च येणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर अन्न व औषधी प्रशासन कारवाई करणार आहे.
२८ आॅगस्ट अंतिम तारीख
सार्वजनीक गणेश मंडळाला गणेश उत्सव साजरा करण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाचा परवाना घ्यावा लागतो. ११ आॅगस्टपासून ह्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. २८ आॅगस्टपर्यंत हा परवाना मंडळांना घेता येणार आहे. यावरच प्रसाद वाटपाचा परवाना मिळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन घटल्याने येथे खव्याची निर्मिती होत नाही. परिणामी राजस्थान येथून खवा आयात करण्यात येत आहे. त्यामध्ये कुंदा आणि सॅकरीन मिसळून मिठाई तयार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न औषध प्रशासन विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. (शहर वार्ताहर)