वनविभागातील नियतकालिक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात; विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच बदलीप्रक्रियेत सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 20:17 IST2025-07-01T20:16:36+5:302025-07-01T20:17:26+5:30
मुदतवाढ कशी ? : पुसदपाठोपाठ, वाशिममध्येही कर्मचाऱ्यांना अभय

Periodic transfers in the Forest Department are under suspicion; Only certain employees are exempted from the transfer process
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पांढरकवडा वनविभागातील कर्मचारी बदल्या वादाचा विषय ठरला होता. आता पुसद, वाशिम आणि यवतमाळवनविभागातील नियतकालिक बदल्यांमध्ये काही कर्मचाऱ्यांना अभय दिल्याचे पुढे येत आहे. पुसद वनविभागातील बदली पात्र यादीतील चार वनपाल आणि ९ वनरक्षकांना आश्चर्यकारक मुदतवाढ दिली आहे. असाच प्रकार पुसद, वाशीम, यवतमाळ वनविभागातही घडला आहे.
यवतमाळ येथील वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयाने तीन वर्ष सेवा पूर्ण होत असलेल्या बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश पुसद उपवनसंरक्षक कार्यालयाला दिले होते. त्यानुसार पुसद वनविभागाने ११ वनपाल, दोन लेखापाल, तीन लिपीक आणि ५५ वनरक्षकांची यादी प्रसिद्ध केली. या चारही संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी बदलीचा एकच नियम आवश्यक आहे. मात्र अधिकाऱ्यांनी सोयीने बदल्या करून मर्जीतील कर्मचाऱ्यांना अभय दिल्याचे दिसत आहे.
५५ वनरक्षकांपैकी तब्बल ९ जणांना एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली. यात खरबी वनक्षेत्र वन्यजीवमधील टिटवी बिट, उमरखेड वनक्षेत्रातील पिंपळगाव बिट, दिग्रस वनक्षेत्रातील विठाळा-२ बिट, सिंगद आगार, बिटरगाव बिट, मारवाडी, खरबी वनक्षेत्रातील द. बोरी-१ बिट आणि थेरडी बिट, सोनदाभी वनक्षेत्र वन्यजीवचे मुरली बिटचा समावेश आहे. मुदतवाढीचे ठोस कारणही दर्शविण्यात आले नसल्याने अन्य कर्मचाऱ्यांत अन्यायाची भावना आहे. तसेच मारवाडी, दिग्रस, सिंगद आणि शिळोणा येथील मुदतवाढ दिली आहे. वनपालांनाही मुदतवाढ दिली आहे.
बदली आदेशानंतरही कार्यमुक्त केलेच नाही
यात काही निवृत्तीच्या वाटेवर असल्याचे नमुद आहे. मात्र उर्वरित वनपालांच्या नावापुढे मुदतवाढीचे कुठलेही कारण नमुद नसल्याने येथेही बदलीचा नव्हे तर सोयीचा नियम लावल्याचे दिसते. लेखापाल आणि लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केवळ कागदोपत्री असल्याची चर्चा आहे. विभागांतर्गत बदलीचा आदेश होऊनही काही कर्मचारी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले नाही. इतर बदली पात्र कर्मचाऱ्यांना मात्र नियम दाखवून पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले. पांढरकवडा, पुसद, वाशिम आणि यवतमाळ वनविभागात काहींना मुदतवाढीतून तर पुढील वर्षी विभागाबाहेर बदलीस पात्र ठरणाऱ्यांना अभय दिल्याने आमच्यावरच अन्याय का, असा सवाल कर्मचारी करीत आहेत.
लिपिक विभागीय कार्यालयातच मुक्कामी
पुसद येथील विभागीय कार्यालयातील लिपिकाची वनक्षेत्र प्रादेशिक कार्यालय मारवाडी येथे रिक्त पदावर बदली केली आहे. याबाबतचा आदेशही ३० मे रोजीच काढला. मात्र व्यवहारात 'माहीर' असलेला हा कर्मचारी अजूनही पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाला नाही. पुढील वर्षी विभागाबाहेर बदली होऊ नये, यासाठी कागदोपत्री खेळ करून लिपिकाची खुर्ची वाचविल्याची चर्चा आहे. बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करावे, असे आदेशात स्पष्ट नमुद आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याला कार्यमुक्त न करण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेंबाळपिंपरी लेखापालाची प्रतिनियुक्ती, बदली चर्चेत
शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयात कार्यरत लेखापालाची पुसद विभागीय कार्यालयात बदली केली आहे. मुळात हा लेखापाल तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रतिनियुक्तीवर विभागीय कार्यालयातच महत्त्वाच्या टेबलवर आहे. वेतन केवळ शेंबाळपिंपरीतून घेतले जात होते. नियतकालिक बदली प्रक्रियेत लेखापाल बदलीस पात्र होता. तसेच पुढील वर्षी विभागाबाहेर बदलीस पात्र होण्याआधीच या कर्मचाऱ्याची शेंबाळपिंपरी येथून विभागीय कार्यालयात रिक्त पदावर बदली केली आहे. ज्या कर्मचाऱ्याच्या रिक्त पदावर लेखापालाची बदली दर्शविण्यात आली, तो कर्मचारी देखील विभागीय कार्यालयातच कार्यरत आहे.
५५ वनरक्षकांची बदली यादी काढली होती
वनरक्षकासह विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एक वर्ष मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, काही विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच बदलीप्रक्रियेत सूट देवून मुदतवाढ देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.