पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी ‘लाखों’चा लोकसहभाग
By Admin | Updated: January 6, 2015 23:08 IST2015-01-06T23:08:30+5:302015-01-06T23:08:30+5:30
जुन्या इमारतींची डागडुजी आणि प्रस्ताव तयार करूनही नवीन बांधकामासाठी निधी मिळत नसल्याने चक्क एका पोलीस ठाण्याची इमारतच लाखो रुपये गोळा करून लोकसहभागातून निर्माण

पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी ‘लाखों’चा लोकसहभाग
यवतमाळ : जुन्या इमारतींची डागडुजी आणि प्रस्ताव तयार करूनही नवीन बांधकामासाठी निधी मिळत नसल्याने चक्क एका पोलीस ठाण्याची इमारतच लाखो रुपये गोळा करून लोकसहभागातून निर्माण झाल्याचे पोलिसातूनच सांगण्यात येत आहे. लोकांनी स्वयंस्फूर्तीने देणग्या देऊन एखाद्या ठाण्याची इमारत उभी करावी हा बहुदा पहिलाच प्रसंग असावा. मात्र एवढे दानशूर व्यक्ती समाजात असताना दोन नव्या ठाण्यांच्या इमारतीसाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर त्या ठाण्यात नेमणूक झालेले कर्मचारीही वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यवतमाळ शहरात वडगाव रोड ठाणे आहे. या ठाण्याची इमारत फार जुनी आहे. डागडुजी आणि कामकाजाच्या दृष्टीने ही इमारत लहान पडते. त्यातच स्वच्छतागृहाचाही प्रश्न आहे. यासाठी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र ठाण्याला इमारत बांधकामासाठी निधी मिळाला नाही. अखेर ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांनी चक्क ठाण्याची इमारत लोकसहभागातून बांधण्याचा निर्णय घेतला. अर्थात हा लोकसहभाग कुठल्या प्रकारचा असेल हे कुणाच्याही सहज लक्षात येईल. मात्र ठाण्याची इमारत शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय उभी होणे ही देखील सकारात्मक बाब असली तरी त्याचे समर्थन मात्र करता येणार नाही. लोकसहभागातून ही इमारत तयार होत असताना वरिष्ठांनीही आजतागायत कुठलाही आक्षेप नोंदविला नाही. त्यामुळे त्यांचीही या ‘लाखों’च्या लोकसहभागाला मूकसंम्मती असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस ठाण्यांच्या इमारती लोकांनी पुढाकार घेऊन उभ्या होणे यातून दानशूर व्यक्तींची प्रगल्भता दिसून येते. मात्र समाजात दानशूर व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे हा देखील एक संशोधनाचा विषय ठरत आहे. दानशूर व्यक्ती बांधकामासाठी पुढे येत असतील तर सुमारे चार महिन्यांपूर्वी मंजुरात मिळालेली वसंतनगर आणि लोहारा एमआयडीसी असे दोन ठाणे मात्र उपेक्षीत ठरत आहे. या ठाण्यात कर्मचाऱ्यांना नेमणूकही देण्यात आली. मात्र इमारतच तयार नसल्याने आणि प्रशासनाकडे निधीच आला नसल्याने या कर्मचाऱ्यांची ‘घर के ना घाट के’ अशी अवस्था झाली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या दोन ठाण्यांच्या इमारतीच्या बांधकामासाठी असेच दानशूर व्यक्ती शोधावे अशी चर्चा खुद्द पोलीस वर्तुळातच आहे. (स्थानिक प्रतिनिधी)