यवतमाळ मेडिकलमध्ये रुग्णाने केला डाॅक्टरवर चाकूने हल्ला; आंदोलनाचा पवित्रा आणि कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2023 21:19 IST2023-01-05T21:18:26+5:302023-01-05T21:19:02+5:30
Yawatmal News वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वार्डात रुग्णावर उपचार करीत असलेल्या कनिष्ठ निवासी डाॅक्टरवर रुग्णाने चाकूने हल्ला केला. यात डाॅक्टरच्या गळ्यावर दुखापत झाली आहे.

यवतमाळ मेडिकलमध्ये रुग्णाने केला डाॅक्टरवर चाकूने हल्ला; आंदोलनाचा पवित्रा आणि कामबंद
सुरेंद्र राऊत
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वार्डात रुग्णावर उपचार करीत असलेल्या कनिष्ठ निवासी डाॅक्टरवर रुग्णाने चाकूने हल्ला केला. यात डाॅक्टरच्या गळ्यावर दुखापत झाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजता रुग्णालयातील वार्ड क्र. २५ मध्ये घडली. त्यानंतर संतप्त डाॅक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेत सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे इतर रुग्णांचीही गैरसोय झाली.
सर्जरी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला असलेले डाॅ. सॅबिस्टीयन (रा. तामिळनाडू) हे सहकारी डाॅ. अभिषेक झा यांच्यासोबत वार्ड क्र. २५ मध्ये राऊंड घेत होते. रुग्णांची तपासणी करीत असताना तेथील दाखल रुग्ण सूरज ठाकूर रा. सावर याने स्वत:च्या पिशवीत असलेला चाकू काढून डाॅक्टरच्या गळ्यावर वर केला. सुदैवाने हा वार वर्मी लागला नाही. मात्र हनुवटी व गळ्यावर जखम झाली. जखमी डाॅक्टरांना तत्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. तर आरोपीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.