शेतकऱ्यांचा संयम सुटला

By Admin | Updated: January 3, 2015 02:12 IST2015-01-03T02:12:24+5:302015-01-03T02:12:24+5:30

रात्रभर थंडीत कुडकुडत कापूस मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. त्यांनी पांढरकवडा मार्गावर जवळपास एक तास रास्ता रोको केला.

The patience of the farmers is resolved | शेतकऱ्यांचा संयम सुटला

शेतकऱ्यांचा संयम सुटला

घाटंजी : रात्रभर थंडीत कुडकुडत कापूस मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. त्यांनी पांढरकवडा मार्गावर जवळपास एक तास रास्ता रोको केला. बाजार समितीच्या घाटी येथील यार्डातील साहित्याची नासधूस करून आपला संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे काहीवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस आणि बाजार समिती सचिवांशी चर्चेनंतर कापूस खरेदी सुरू करण्यात आली.
परिसराच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच आपला कापूस बैलगाडी, ट्रॅक्टर, टेम्पो, मालवाहू वाहने आदी साधनांद्वारे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाटी येथील यार्डात आणला होता. दोन दिवसांपासून वाढलेल्या थंडीतही कुणी शेकोटी पेटवून तर कुणी ऊबदार वस्तू अंगावर घेऊन रात्र काढली. सकाळी कापूस खरेदी सुरू होईल या प्रतीक्षेत ते होते. यार्डाचा संपूर्ण परिसर कापूस विक्रीसाठी आणलेल्या वाहनांनी भरून गेला होता. मात्र सकाळी १० वाजताच्या सुमारास झालेल्या तुरळक पावसाचे निमित्त करून बाजार समितीने कापूस खरेदी केली जाणार नाही, असे सांगितले.
रात्रभर कापूस मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीला सवाल केला. मात्र बाजार समिती आपल्या भूमिकेवर ठाम होती. तुरळक पावसामुळे कापूस खरेदी थांबविल्याच्या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कापूस भरलेली वाहने घाटंजी-पांढरकवडा मार्गावर लावून रास्ता रोको केला. जवळपास दीड तासपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या बाबीची माहिती मिळताच बाजार समितीचे सभापती आणि सचिवांनी पोलिसांशी संपर्क केला. त्यामुळे पोलीस निरीक्षक कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या यार्डातील टेबल, खुर्च्या, पाण्याच्या कॅनची मोडतोड केली.
पोलीस आणि बाजार समितीच्या सचिवांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यानंतर निघालेल्या तोडग्यामुळे कापूस खरेदी करण्यात आली. यार्डात असलेल्या सर्व गाड्यांचा लिलाव करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: The patience of the farmers is resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.