पारवा सरपंच पतीच्या खुनातील सहा आरोपींना रायगडमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:30 IST2018-04-06T23:30:13+5:302018-04-06T23:30:13+5:30
लगतच्या पारवा येथील सरपंच पतीच्या खून प्रकरणातील सहा आरोपींना रायगड जिल्ह्यातील खोपोली येथून अटक करण्यात टोळी विरोधी पथकाला यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.

पारवा सरपंच पतीच्या खुनातील सहा आरोपींना रायगडमधून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लगतच्या पारवा येथील सरपंच पतीच्या खून प्रकरणातील सहा आरोपींना रायगड जिल्ह्यातील खोपोली येथून अटक करण्यात टोळी विरोधी पथकाला यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.
पारवा येथे मंगेश गावंडे यांचा २७ मार्चला खून करण्यात आला होता. १२ जणांवर खुनाचा गुन्हा नोंदविला. यापैकी प्रवीण भगत, भीमराव अवथरे, सुनील देवतळे, हनुमान पेंदोर यांना यापूर्वीच अटक केली होती. उर्वरित आरोपी मुंबईकडे पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून टोळी विरोधी पथक कुर्ला, मुलूंड, डोंबिवली परिसरात तळ ठोकून होते. दरम्यान आरोपी खोपोलीत बांधकाम मजूर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून एपीआय संदीप चव्हाण, पीएसआय संतोष मनवर यांचे पथक तेथे धडकले. सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यात राज गोपाल ठाकूर, मुन्ना गोपाल ठाकूर, विनोद प्रकाश चपरिया, भूपेंद्र ऊर्फ गोपी मनिराम शिबलकर, शुभम सुरेश टेकाम आणि सुमीत महादेव मेश्राम यांचा समावेश असल्याचे एसपी एम. राज कुमार यांनी सांगितले. उर्वरित दोन आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, एसडीपीओ पियुष जगताप, एलसीबीचे पोलीस निरीक्षक मुकूंद कुळकर्णी उपस्थित होते.
टोळीशी संबंध नाही
खूनप्रकारात अटकेतील आरोपींपैकी कुणाचाही कोणत्याही टोळीशी संबंध असल्याचे निदर्शनास आले नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिली. मात्र मुन्ना गोपाल ठाकूर याच्यावर प्रवीण दिवटे हत्याकांडातील आरोपींना आश्रय दिल्याचा गुन्हा दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.