गुंज साखर कारखाना सुरू होण्याच्या हालचालींना वेग
By Admin | Updated: April 2, 2015 00:06 IST2015-04-02T00:06:27+5:302015-04-02T00:06:27+5:30
राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद उपविभागातील सहकार क्षेत्राला सध्या घरघर लागली आहे.

गुंज साखर कारखाना सुरू होण्याच्या हालचालींना वेग
पुसद : राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद उपविभागातील सहकार क्षेत्राला सध्या घरघर लागली आहे. लगतच्या महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हा कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर देण्यासाठी येथील शिष्टमंडळाने केलेल्या प्रयत्नांना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवी झेंडी दिल्याची माहिती आहे.
पुसद उपविभागातील ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. हा साखर कारखाना दोन वर्षांपासून बंद आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकारातून आणि बाबासाहेब देशमुख सवनेकर, विजय पाटील चोंढीकर, संभाजीराव नरवाडे, माजी मंत्री मनोहरराव नाईक आदींच्या सहकार्याने १९९५-९६ मध्ये गुंज येथे सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली. या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान मनोहरराव नाईक यांना मिळाला. त्यानंतर अॅड़ निलय नाईक, सतीश बयास, पंजाबराव देशमुख खडकेकर, बंडोपंत वायकुळे, दिलीप बेद्रे आदींनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
सुरूवातीला प्रगतीपथावर असलेल्या या साखर कारखान्यात ८१० लोकांना रोजगार मिळाला होता. मात्र २००४ पासून हा कारखाना बंद पडल्याने या सर्वांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. त्यानंतर २००९ ते २०१२ या कालावधीत हा कारखाना तात्यासाहेब कोरे यांच्या वारणा ग्रुपला भाडेतत्वावर देण्यात आला होता. वारणाने आपला करार संपण्यापूर्वीच गुंज येथील साखर कारखाना बंद केला. त्यामुळे पुन्हा असंख्य कामगार बेरोजगार झाले.
दरम्यान आता पुन्हा कारखाना सुरू होण्याच्या हालचालींना वेग आल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. याच दिशेने एक पाऊल म्हणून राज्याच्या सहकार मंत्र्यांशी मुंबई येथे शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यांनी कारखाना सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली. कारखाना दीर्घ मुदतीने भाडे तत्वावर देऊन पुढील हंगामात सुरू करण्यात यावा असे ठरविण्या आल. यापूर्वी मनोहरराव नाईक यांनी हा कारखाना दीर्घ मुदतीने भाडे तत्वावर देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. आमदार राजेंद्र नजरधने यांनीही पाठपुरावा केला. सामूहिक प्रयत्नांना आता यश येत आहे. या संबंधित झालेल्या बैठकीला आमदार मदन येरावार, आमदार राजेंद्र नजरधने, पंजाबराव देशमुख खडकेकर, माजी आमदार विनय कोरे, राज्याचे सहकार सचिव, पुणे येथील सहकार आयुक्त, संभाजीराव नरवाडे, सिताराम ठाकरे, साहेबराव पाटील, गुलाबराव जाधव, दीपक आडे, अॅड राजेंद्र देशमुख आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
पुसदच्या सूतगिरणीसाठीही प्रयत्न होण्याची अपेक्षा
पुसद येथील यवतमाळ सहकार सूत गिरणी मागील २५ वर्षांपासून बंद अवस्थेत असून, या गिरणीतील तब्बल एक हजार २०० कामगार बेरोजगार झालेले आहेत. त्यातील अनेकांचे निधनही झाले आहे. उर्वरित कामगार मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. पुसदचे वैभव असलेली ही बंद सूत गिरणी पुन: सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा करण्यात येत आहे.