३६ सहकारी संस्थांकडे १०० कोटी रुपये थकीत
By Admin | Updated: June 15, 2017 00:57 IST2017-06-15T00:57:09+5:302017-06-15T00:57:09+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३६ सहकारी संस्थांकडे तब्बल शंभर कोटी रुपये थकीत असल्याचे पुढे आले आहे.

३६ सहकारी संस्थांकडे १०० कोटी रुपये थकीत
जिल्हा बँक : साखर कारखाना, जिनिंग, पगारदार संस्थांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३६ सहकारी संस्थांकडे तब्बल शंभर कोटी रुपये थकीत असल्याचे पुढे आले आहे.
राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम थकीत असलेल्या संस्था व सभासदांची तत्काळ माहिती मागितली. त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हिशेब तपासला असता ३६ संस्थांकडे दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. त्यांच्याकडील थकबाकीचा हा आकडा शंभर कोटींवर पोहोचला आहे. त्यात पोफाळीच्या वसंत सहकारी साखर कारखान्याकडील ३३ कोटींच्या रकमेचा समावेश आहे. याशिवाय दारव्हा, यवतमाळ, आर्णी व बाभूळगाव येथील चार जिनिंग प्रेसिंग संस्थांकडे सुमारे ३० कोटींची रक्कम थकीत आहे. दारव्हा येथील पगारदार संस्थेकडे १८ कोटी थकीत आहे. सर्वसेवा व्यापार संकुलाकडे पाच कोटी, महागावातील सहकारी संस्थेकडे ४० लाख थकलेले आहेत. राळेगाव ग्रामीण पतसंस्था व आणखी काही सहकारी संस्थांचा समावेश आहे. जिनिंग प्रेसिंग पैकी कुठे अवसायक तर कुठे प्रशासक नियुक्त आहेत. शासन कर्जमाफीच्या दृष्टीने अभ्यास करीत असताना जिल्हा बँकांकडे थकीत असलेल्या रकमेचा मोठा आकडा पुढे आला. म्हणूनच ही थकबाकी नेमकी कुणाकडे व केव्हापासून याची तपासणी केली जात आहे.
८० सभासद नऊ कोटींचे थकबाकीदार
८० वैयक्तिक सभासदांकडे आठ ते नऊ कोटी रुपयांची थकबाकी आहे. संस्था व सभासदांमिळून थकीत असलेले ११० कोटी रुपये जवळपास बुडित असल्याचे मानले जाते. हे ११० कोटींचे कर्ज जिल्हा बँकेच्या दप्तरी एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) म्हणून नोंद आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकेने खूप आक्रमक भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही, कारण यातील अनेक संस्थांवर बँकेच्या संचालकांपैकी व राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे वर्चस्व राहिलेले आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी लिलाव प्रक्रियेची तयारी केली होती. मात्र मधातच कर्जमाफीची घोषणा झाल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला. उपरोक्त संस्था व सभासदांकडे वर्षानुवर्षाची थकबाकी आहे. वणी विभागात थकबाकीचा हा आकडा कमी असल्याचे सांगितले जाते.