Out of control car directly into the well; Father and daughter killed in accident | नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीत; अपघातात वडील व मुलगी ठार

नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीत; अपघातात वडील व मुलगी ठार

पुसद (यवतमाळ) : तालुक्यातील वालतूर (रेल्वे) येथे व्हीस्टा वाहन विहिरीत पडून वडील व मुलगी जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. विनोद दत्ताराव पाटील (४५) आणि शुभांगी विनोद पाटील (१८) अशी मृतांची नावे असून ते वालतूर येथील रहिवासी आहेत. या दोघांसह विनोद यांची पत्नी विद्या असे तिघेजण सोमवारी व्हीस्टा कारने (क्र. एमएच २९-एडी २०५५) शेतात जात होते.

परत येत असताना गावानजीक विनोद यांनी पत्नी विद्या यांना वाहनातून उतरून देऊन वाहन वळवितो असे सांगितले. मात्र त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांचे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका कच्च्या विहिरीत कोसळले. ही विहीर पाण्याने पूर्णपणे भरलेली होती. या अपघातात मुलगी व वडील जागीच ठार झाले. विद्या यांनी आरडाओरड केली असता गावकरी गोळा झाले. त्यांनी वसंतनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत विनोद व शुभांगी या दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढून येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मंगळवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे. 

मृत विनोद पाटील यांना चारही मुली आहे. चारही मुली अविवाहित आहे. त्यांची मोठी मुलगी विशाखा गावची सरपंच आहे. मृतक शुभांगी ही दुस-या क्रमांकाची मुलगी होती. तिच्यापेक्षा अर्पिता व स्वरा या दोन लहान भगिनी आहे.  या घटनेने वालतूर (रेल्वे) येथे शोककळा पसरली.

Web Title: Out of control car directly into the well; Father and daughter killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.