अनाथांचा पुरवला बालहट्ट
By Admin | Updated: November 10, 2015 03:13 IST2015-11-10T03:13:37+5:302015-11-10T03:13:37+5:30
मध्यवस्तीत असूनही ती इमारत तशी वर्दळीपासून दोन हात दूरच. यवतमाळातल्या माणसांची तिकडे फारशी नजर वळत नाही.

अनाथांचा पुरवला बालहट्ट
ढोल-ताशा पथक : अनाथालयावर रोषणाई, वर्षभराचे धान्य, फटाके वाटप
यवतमाळ : मध्यवस्तीत असूनही ती इमारत तशी वर्दळीपासून दोन हात दूरच. यवतमाळातल्या माणसांची तिकडे फारशी नजर वळत नाही. अनाथ मुलींचे ते घर. पण रविवारी या घरावर रोषणाई करण्यासाठी काळ्या टी-शर्टमधली तरुणाई धडपडत होती. जिथे आई-बाबा हे नातेच माहिती नाही, तिथल्या बहिणींसाठी काही भाऊ आले होते, थेट नागपुरातून!
मायापाखर बालगृह नावाचे हे घर. तब्बल १७ अनाथ मुलींचा हा आसरा. बालगृहाचे व्यवस्थापन या मुलींसाठी झटतेच. पण त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांतून कधी मायेचा ओलावा पाझरत नाही. पण नागपूरच्या तरुणाईने यवतमाळातील ‘मायापाखर’चा शोध घेतला. शिवसंस्कृती ढोल-ताशा पथकाचे हे तरूण रविवारी यवतमाळात पोहोचले. बालगृहातील निरागस मुलींना आश्चर्याचा धक्काच बसला. काही कळायच्या आत या तरुणांनी संपूर्ण इमारतीवर दिवाळीनिमित्त खास रोषणाई केली. घरोघरी दिवाळीची सजावट सुरू असताना या अनाथांच्या घरातही सजावट होऊ लागली. अनाथ जीव हरखून गेले. संपूर्ण रोषणाई झाल्यावर अनाथ मुलींना थंडीत संरक्षणासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले. दिवाळी साजरी करता यावी यासाठी फटाके, अभ्यंगस्नानासाठी उटणे, मोती साबण, दिवे, मिठाई, चॉकलेट्स देण्यात आले. त्यांच्या शिक्षणाला मदत म्हणून वह्या पुस्तकेही देण्यात आली. एवढेच नव्हेतर वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा बालगृहाला देण्यात आला. शिवसंस्कृती ढोल-ताशा पथकाच्या या अवचित भेटीने मायापाखर बालगृहात रविवारी खऱ्या अर्थाने दिवाळी अवतरली होती.
एकीकडे समाजात एकलकोंडेपणा वाढत असताना शिवसंस्कृती ढोल-ताशा पथकाच्या तरुणांनी दाखविलेले औदार्य महत्त्वपूर्ण आहे. तरुण वयात मुलं कमाईला लागतात. मात्र या पथकातील १८० तरुण कमावण्यापेक्षा वाटण्यावर जोर देतात. ढोल वादनातून मिळविलेल्या रकमेतून उपेक्षितांना मदत करणे, हाच त्यांचा अजेंडा आहे. विशेष म्हणजे, या तरुणांनी आपल्यापैकीच काही जणांची चमू बनवून विदर्भभरात कोणत्या ठिकाणी मदत करता येईल, याचा शोध घेतला. गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी यवतमाळातील मायापाखर या बालगृहाची मदतीसाठी निवड केली. त्यानंतर या ठिकाणच्या मुलींना कोणत्याप्रकारे मदत करता येईल, त्याची तजविज केली. सर्व व्यवस्था झाल्यावर रविवारी सकाळीच नागपुरातून या पथकातील प्रसाद मांजरखेडे, सुमंत ठाकरे, प्रसाद पाचखेडे, प्रकाश दुर्गे, श्रेयस फाटे यांच्यासह ३० तरुण यवतमाळात पोहोचले. एका वाहनात कपडे, धान्य व इतर मदतीचे साहित्य घेऊन आले. पण केवळ मदत देणे आणि निघून जाणे एवढे मर्यादित स्वरुप या कार्यक्रमाचे नव्हते. तर शिवसंस्कृतीच्या तरुणांनी दिवाळीचा प्रसंग लक्षात घेऊन संपूर्ण बालगृहाची सजावट केली. आपण अनाथांना मदत देतोय यापेक्षा आपण आपले कर्तव्य बजावतोय, हीच भावना त्यांच्या वर्तनात होती. (स्थानिक प्रतिनिधी)