‘वसंत’ची मालमत्ता जप्तीचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 21:58 IST2018-02-04T21:57:19+5:302018-02-04T21:58:13+5:30
तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस तहसीलदारांनी बजावली आहे. यामुळे वसंतच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.

‘वसंत’ची मालमत्ता जप्तीचा आदेश
ऑनलाईन लोकमत
उमरखेड : तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस तहसीलदारांनी बजावली आहे. यामुळे वसंतच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.
वसंत सहकारी साखर कारखान्यातील १७३ कामगारांच्या ग्रॅज्युएटीची रक्कम प्रशासनाने जमा केली नाही. तब्बल चार कोटी ५५ लाख ३३ हजारांची रक्कम कारखान्याकडे थकीत राहिली. त्यामुळे कामगार संघटनेने कामगार न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय देत कारखान्याची मालमत्ता जप्त करून त्यातून ग्रॅज्युएटीची रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला.
न्यायालयाने यासंदर्भात पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी येथील तहसीलदार भगवान कांबळे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यावरून तहसीलदार भगवान कांबळे यांनी कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा आदेश पारित केला. तशी नोटीस वसंतच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. यामुळे कारखाना प्रशासन हादरले आहे.
वसंत रोपवाटिकेतील सर्वे नं. ६०/१, ६०/२, ६१/१ आणि ५६/३ ही मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. यापूर्वीही मध्यवर्ती बँकेने ४० कोटींच्या वसुलीसाठी जप्तीचे आदेश दिले होते.