स्थायी समितीचा पुन्हा प्रतिनियुक्ती रद्दचा आदेश
By Admin | Updated: January 5, 2015 23:12 IST2015-01-05T23:12:17+5:302015-01-05T23:12:17+5:30
जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचा मुद्दा गाजला. सदस्यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे नव्याने प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे आदेश

स्थायी समितीचा पुन्हा प्रतिनियुक्ती रद्दचा आदेश
यवतमाळ : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचा मुद्दा गाजला. सदस्यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे नव्याने प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे आदेश सीईओ डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिले. या बैठकीत सर्व सदस्यांनी एक गाव आदर्श करण्यासाठी निवडावे असा ठरावही घेण्यात आला.
शाळा देखभाल दुरुस्तीसाठी आलेला निधी खर्च न करताच परत गेला. यात जबाबदार असलेल्या शिक्षणाधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यावर कारवाई होईल. मात्र परत गेलेले ७२ लाख रुपये शासनाकडून मागण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी बैठकीत केली. पाणीटंचाईच्या १० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी देण्यात आली. मुद्रांक शुल्क प्रकरणात कुठलाही संबंध नसताना निलंबित केलेल्या ग्रामसेवकांना पुन्हा नियुक्ती देण्याबाबतही चर्चा झाली. अमन गावंडे यांनी उपस्थित केलेला रोहयोतील भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेत आला. यामध्ये दोन कामावर एकच मजूर दाखविण्यात आल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे आता तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी गावंडे यांनी केली. बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्य, बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती तातडीने रद्द केली जावी, अशी मागणी करण्यात आली. यावर सीईओंनी विभाग प्रमुखांना नव्याने निर्देश दिले. अशा कर्मचाऱ्यांचा पगारच थांबविला जाईल, असाही इशारा दिला.
बैठकीमध्ये पशुसंवर्धन विभागातील ४५ लाखांच्या औषधी खरेदीस मंजूरी देण्यात आली. शाळा इमारत निर्लेखणाचाही ठराव मंजूर करण्यात आला. वणी तालुक्यातील चारगाव येथे ग्रामपंचायतीने दारू दुकानाला परवानगी देण्याचा ठराव घेतला. यावर महिला सदस्यांनी आक्षेप घेवून सीईओंनी त्याला मंजूरी देवू नये अशी मागणी केली. याबाबत महिलांचे शिष्टमंडळही जिल्हा परिषदेत आले होते. बैठकीला अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कलशेट्टी, सर्व विभाग प्रमुख व समिती सदस्य उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)