विरोधी पक्ष बिघडलेल्या बबड्यासारखा; निलम गोर्हे यांचे टिकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 16:05 IST2021-10-26T15:37:28+5:302021-10-26T16:05:48+5:30
इंधनाच्या किमंती भयावह वाढल्या आहेत. केंद्राने अद्याप जीएसटीचे पैसे दिले नाहीत. अशा परिस्थितीतही राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

विरोधी पक्ष बिघडलेल्या बबड्यासारखा; निलम गोर्हे यांचे टिकास्त्र
नांदेड- इंधन दरवाढ, कोरोनात आलेले अपयश आणि अच्छे दिनाच्या स्वप्नांचा झालेला चुराडा याचे अपयश झाकण्यासाठी विरोधी पक्षाकडून दररोज कथित घोटाळे काढण्यात येत आहेत. मूळ प्रश्नांपासून लोकांना विचलित करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे विराेधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झाली आहे, असा टोला शिवसेना उपनेत्या निलम गोर्हे यांनी लगाविला.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी त्या नांदेडात आल्या होत्या. यावेळी गोर्हे म्हणाल्या, भल्या पहाटेचे काही तासांचे सरकार आल्यानंतर केंद्राकडून आलेले दहा हजार कोटी रुपये परत करण्याचा कोत्तेपणाचा निर्णय भाजपाने घेतला होता. अन् आता शेतकर्यांना राज्य सरकार मदत करीत असताना कोट्यवधींची मदत यांना फुटकी कवडी वाटते याचे आश्चर्य आहे. पिक विमा योजना दोषपूर्ण आहे. इंधनाच्या किमंती भयावह वाढल्या आहेत. केंद्राने अद्याप जीएसटीचे पैसे दिले नाहीत. अशा परिस्थितीतही राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. केंद्र सरकार बद्दल जनतेत प्रचंड आक्रोश आहे. परंतु अपयश झाकण्यासाठी दररोज बर्निंग ट्रेनसारखे आरोप करीत सुटायचे हेच काम सुरु आहे. भाजपाचे नेते शिवसेनेचे आमदार खिशात असल्याचे सांगत सुटले आहेत. परंतु यांच्या खिशात केवळ काडीपेटी आहे. काडी टाकायची, आग लागली तर उत्तम नाही तर निघणार्या धूरामुळे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायची असा यांचा एजेंडा आहे. असा आरोपही गोर्हे यांनी केला.
महिलांचे अत्याचार नोंदविणे वाढले आहे. कोणत्याही सरकारच्या काळात अत्याचार थांबले नाहीत. राजकीय पक्षांनीही त्याचे भांडवल करु नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खा.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर, संपर्क प्रमुख आनंद जाधव, जिल्हाध्यक्ष दत्ता कोकाटे, आनंद बोंढारकर, उमेश मुंढे, प्रकाश मारावार यांची उपस्थिती होती.