ढाणकी पीएचसीत एकच डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:42 IST2021-04-16T04:42:44+5:302021-04-16T04:42:44+5:30
ढाणकी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार सध्या एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यांना नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात ...

ढाणकी पीएचसीत एकच डॉक्टर
ढाणकी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार सध्या एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यांना नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होत आहे. ऐन कोरोना काळात येथे संकट निर्माण झाले आहे.
येथे नव्यानेच कोट्यवधी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात आली. मात्र, इमारत शोभेची वस्तू ठरत आहे. सुविधा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहे. मात्र, त्यापैकी एक सतत आजारपणामुळे रजेवर असतात. परिणामी एकाच डॉक्टरवर संपूर्ण ताण पडत आहे. कुठे शिबिर असो की मग मीटिंग, त्यांची धावपळ होते. त्याचा रुग्ण तपासणीवर परिणाम होतो. सध्या शहरात विविध आजारांची साथ सुरू आहे. सर्व दवाखाने रुग्णांनी भरलेले आहे. अशावेळी गरिबांचा आधार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची कमतरता आहे.
सध्या कोविडमुळे सर्वत्र हाहाकार आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध होत नाही, तोपर्यंत शहरातील खासगी डॉक्टरांनी दोन तास जरी आपली सेवा दिली, तर नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. सध्या एकच डॉक्टर कार्यरत आहे. औषध निर्माण अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्य सहायक महिला, परिचर यांची प्रत्येकी एक पदे रिक्त आहे. ही पदे तातडीने भरावी, अशी मागणी आहे.