तालुक्यात आजपर्यंत केवळ ६७ मिलीमीटरच पाऊस
By Admin | Updated: June 26, 2014 00:02 IST2014-06-26T00:02:45+5:302014-06-26T00:02:45+5:30
यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर गेल्या १७ जूनपर्यंत तालुक्यात केवळ ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर १८ जूनपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी खोळंबली आहे.

तालुक्यात आजपर्यंत केवळ ६७ मिलीमीटरच पाऊस
वणी : यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर गेल्या १७ जूनपर्यंत तालुक्यात केवळ ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर १८ जूनपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी खोळंबली आहे. कृषी विभागाने ७0 टक्के पेरणी झाल्याचे सांगितले.
रोहिणी नक्षत्र सुरू होताच शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी धावपळ सुरू केली होती. ८ जूनपासून मृगाला सुरूवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा होती. सुरूवातीला पाऊस आला. त्यामुळे १७ जूनपर्यंत ६७ मिलीमीटर पावसाची नोंदही झाली. त्यात एकाच दिवशी १७ जूनला सर्वाधिक ४६ मिलीमीटर पाऊस झाला. मागीलवर्षी १७ जूनपर्यंत तब्बल ४00 मिलीमीटर पाऊस झाला होता, हे विशेष. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा अदमास घेत पेरणीसाठी लगबग सुरू केली होती. तथापि १८ जूनपासून पावसाने दडी मारल्याने आता तालुक्यात उर्वरित पेरणीच खोळंबली आहे.
मागीलवर्षी आजपर्यंत अर्थात २५ जूनपर्यंत तब्बल ४३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मात्र केवळ ६७ मिलीमीटरच पाऊस झाला आहे. किमान ७0 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करून नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र मृगातच पेरणी साधते, असा अनुभव असल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे. आता ही संपूर्ण धूळ पेरणी उलटण्याच्या मार्गावर आहे. पावसाचे कोणतेही संकेत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात एकूण ९२ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ६४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीयोग्य आहे. यावर्षी त्यापैकी ६२ हजार ७९३ हेक्टरवर खरीपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यातील ४६ हजार ३७0 हेक्टरवर कपाशीची पेरणी होण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी ४२ हजार ३३८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. कृषी विभागाच्या माहितीनुसार आजपर्यंत त्यापैकी जवळपास तब्बल ७0 टक्के अर्थात किमान ३0 हजार हेक्टरवर कपाशी पेरणी झाली. मात्र ही सर्व पेरणी आता पावसाअभावी उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यात मागीलवर्षी ११ हजार ९९७ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली होती. यावर्षी सोयाबिनचा पेरा कमी होणार असून १0 हजार ७९८ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी सोयाबिनची पेरणीही रखडली आहे. मात्र सोयाबिनची परेणी करण्यास अद्याप अवधी आहे. तथापि कपाशीची पेरणी मात्र त्वरित करणे गरजेचे आहे. पावसाने दडी मारल्याने आता कपाशीची पेरणीच संकटात सापडली आहे.
पेरणीला उशीर झाल्यास उत्पन्नात घट येण्याची शक्यता तालुक्यातील २६ हजार शेतकऱ्यांना सतावत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)