118 गावांसाठी केवळ 63 पोलीस कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST2021-08-23T05:00:00+5:302021-08-23T05:00:11+5:30

सन १९२२ ला ब्रिटिशकालीन पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्याचवेळी पांढरकवडा पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथे रुंझा, करंजी, पाटणबोरी या तीन ठिकाणी दूरक्षेत्र आउटपोस्ट  समाविष्ट करण्यात  आले. सद्य:स्थितीत सर्वात जास्त तीन आउटपोस्ट असणारे यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव ठाणे आहे. पांढरकवडा तालुका आणि शहर संवेदनशील म्हणून पोलीस दप्तरी नोंदविला आहे.

Only 63 police personnel for 118 villages | 118 गावांसाठी केवळ 63 पोलीस कर्मचारी

118 गावांसाठी केवळ 63 पोलीस कर्मचारी

प्रवीण पिन्नमवार
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यातील एक लाख ५६ हजार २९० लोकसंख्येच्या रक्षणासह कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पांढरकवडा पोलीस ठाण्यात केवळ ६३ पोलीस कार्यरत आहेत. त्यांच्यावर ११८ गावांची जबाबदारी आहे. ठाण्याचे कार्यक्षेत्र आणि घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता, पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. बंदोबस्ताच्या काळात तर पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढत आहे. त्यामुळे रिक्त असलेली पदे भरण्याची मागणी केली जात आहे.
सन १९२२ ला ब्रिटिशकालीन पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्याचवेळी पांढरकवडा पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथे रुंझा, करंजी, पाटणबोरी या तीन ठिकाणी दूरक्षेत्र आउटपोस्ट  समाविष्ट करण्यात  आले. सद्य:स्थितीत सर्वात जास्त तीन आउटपोस्ट असणारे यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव ठाणे आहे. पांढरकवडा तालुका आणि शहर संवेदनशील म्हणून पोलीस दप्तरी नोंदविला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांना नेहमी सज्ज रहावे लागते. परंतु पांढरकवडा पोलीस ठाण्यात शिपायांची पदे रिक्त आहे. येथे ९७ पदे मंजूर असताना केवळ ६३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील चार ते पाचजण साप्ताहिक रजेवर, तर चार ते पाचजण किरकोळ कारणाने सुट्टीवर असतात. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे एक लाख ५६ हजार २९० लोकसंख्या आहे. ठाण्याअंतर्गत ११८ गाव असून, पांढरकवडा ते अर्ली ४८ किलोमीटर तेलंगणा सीमेपर्यंत एका टोकाला, तर पांढरकवडा ते मोहदा २८ किलोमीटर दुसऱ्या टोकाला इतक्या किलोमीटरचा विस्तार आहे. त्यामुळे काही घटना घडल्यास पोलिसांना पोहोचण्यास विलंब होतो. नागरिकांमध्ये पोलिसांप्रति असंतोष दिसून येतो. तेलंगणा सीमा, राष्ट्रीय महामार्ग तर दूरपर्यंत असलेले पोलिसांचे कार्यक्षेत्र यामुळे गुन्हेगार व गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. अत्यल्प पोलीस बळाच्या भरवशावर सर्वत्र लक्ष ठेवण्याची मोठी कसरत दिसून येते. या ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांची ९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३४ पदे ही पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांची रिक्त आहे.

नक्षल भत्त्यापासून पोलीस शिपाई वंचित
कार्यरत पोलीस शिपाई हे २०१७ पासून नक्षलग्रस्त भत्त्यापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस अधिकाऱ्यांना हा नक्षलग्रस्त भत्ता मिळत आहे. परंतु येथील शिपाई यापासून वंचित आहेत. तसेच शिपायांच्या कमतरतेमुळे कामाचा ताण वाढला आहे. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणाकडे व आरोग्याकडे होत असून, लक्ष देण्यात अडचणी येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

 

Web Title: Only 63 police personnel for 118 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस