फक्त ५१% जलसाठा! यवतमाळ जिल्ह्यात पाण्याची स्थिती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:12 IST2025-08-04T19:12:14+5:302025-08-04T19:12:48+5:30
जिल्ह्यात ७५ सिंचन प्रकल्प : उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसणार का?

Only 51% water storage! Water situation in Yavatmal district is alarming
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु असे ७५ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या भरोशावरच जिल्हावासीयांची तहान भागते. तसेच शेती सिंचनासाठीही याच प्रकल्पातून पाणी सोडले जाते. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारसी वाढ झालेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांतील पाणीसाठ्याची टक्केवारी कमी आहे.
गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन नदी-नाले ओसंडून वाहली होती. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात फारसी पाणीटंचाई जाणवली नाही. अपवाद काही तालुक्यांतील गावांना टँकर्सने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. शिवाय काही विहिरींचे अधिग्रहण करण्यातत आले होते. मात्र, शहरांना पाणीटंचाईचा फटका बसला नाही. जिल्ह्यात पुस, बेंबळा आणि अरुणावती असे तीन मोठे प्रकल्प आहेत. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी या सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नसल्याचे दितस आहे. अरुणावती प्रकल्पात तर अवघे २९ टक्केच पाणी आहे. लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थितीही विशेष नाही. केवळ मध्यम प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे. एकूण प्रकल्पांत ५१.३२ टक्केच पाणी असल्याने चिंता कायम आहे. त्यामुळे दमदार पावसाची आवश्यकता आहे.
प्रकल्पांमध्ये आहे जेमतेमच जलसाठा
मोठ्या पूस प्रकल्पात ५६.२८ टक्के जलसाठा असून, बेंबळात ३७.४० तर अरुणावतीत केवळ २९.२६ टक्केच पाणी आहे. मध्यम सातपैकी दोन १०० टक्के भरले असून, इतर पाच प्रकल्पात बऱ्यापैकी साठा आहे. लघू ६५ प्रकल्पांत केवळ ५२.६० टक्के पाणी आहे. गतवर्षी लघू प्रकल्पांत ६२.९९ टक्के जलसाठा होता.
पाच प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
मध्यम वाघाडी १३ सेमी तर सायखेडा प्रकल्पातून १२ सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेमीने उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. लघू प्रकल्प असलेल्या टाकळीतून १.५० आणि मुंजाळा प्रकल्पातून २ सेमीने पाणी विसर्ग सुरू आहे.
२०२४ च्या तुलनेत मोठा बॅकलॉग
जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघू असे एकूण ७५ प्रकल्प आहे. गतवर्षी या सर्व प्रकल्पांमध्ये याच कालावधीपर्यंत ६५.१८ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र कमी पर्जन्यमानामुळे प्रकल्पांमध्ये केवळ ५१.३२ टक्केची पाणी आहे. त्यामुळे सुमारे १४ टक्के पाण्याचा बॅकलॉग आहे. धरणे तुडुंब भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
मोठ्या, मध्यम प्रकल्पांतील पाण्याची आकडेवारी
प्रकल्प दलघमी टक्के
पूस ५१.३६ ५६.२८
अरुणावती ४९.६५ २९.२६
बेंबळा ६८.८० ३७.४०
गोकी २४.०८ ५६.३८
वाघाडी ३५.३६ १००
सायखेडा २७.१८ १००
लोअरपूस ३८.०० ६३.७३
बोरगाव ५.७७ ८७.२९
अडाण ४२.३९ ६३.०३
नवरगाव ११.५८ ९२.७९
किती प्रकल्प ओव्हरफ्लो ?
जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांपैकी केवळ वाघाडी आणि सायखेडा हे दोनच प्रकल्प ओव्हरफ्लो झाली आहे. या प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा असून, इतर पाच प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांच्या आतच पाणी आहे.