१२०० एकर शेतीचा मक्ता केवळ चार हजार !
By Admin | Updated: October 18, 2014 02:01 IST2014-10-18T02:01:20+5:302014-10-18T02:01:20+5:30
इंच इंच जमिनीसाठी भानगडी सुरू असताना आणि शेतजमिनीचे भाव आकाशाला भिडले असताना तब्बल १२०० एकर शेत जमिनीचा मक्ता चार हजार रुपये ..

१२०० एकर शेतीचा मक्ता केवळ चार हजार !
बी. संदेश आदिलाबाद
इंच इंच जमिनीसाठी भानगडी सुरू असताना आणि शेतजमिनीचे भाव आकाशाला भिडले असताना तब्बल १२०० एकर शेत जमिनीचा मक्ता चार हजार रुपये मिळतो हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही. मात्र पांढरकवडा तालुक्यातील घोन्सी येथील ७७ मक्तेदार एकरी १४ रुपयाने जमीन कसत आहेत. ही जमीन आहे आदिलाबाद येथील प्रसिद्ध शंकराचार्य परंपरेच्या रामचंद्र गोपालकृष्ण मठाच्या मालकीची.
मठाचे तत्कालीन आठवे महंत ब्रह्मनंद सरस्वती यांच्या नावाने ही १२०० एकर जमीन असून ती १९५६ साली अकोला येथील रजिस्टर कार्यालयात नोंदणीकृत आहे. ही संपूर्ण १२०० एकर जमीन घोन्सी येथील ७७ मक्तेदारांना मक्त्याने दिली असून तशी नोंदसुद्धा शासनदरबारी करण्यात आली. एकरी १४ ते १६ रुपये मक्त्यातून या शेतजमिनीचे मठाला केवळ १२०० रुपये वार्षिक उत्पन्न येत आहे. अनेक गोरगरीब ही जमीन गेल्या कित्येक वर्षांपासून कसत आहेत. जमिनीचा पट्टा अद्यापही मठाच्या नावाने असल्याने शेतसारा मठास भरावा लागतो. दरम्यान ४०० वर्ष जुन्या या मठाच्या जमिनी कसरणाऱ्या मक्तेदारांना बँकेत कर्ज आदी सुविधा मिळत नाही. मात्र कोट्यवधी रुपयांची जमीन आज ते कसत आहे.
या मक्तेदारांच्या अज्ञानाचा आणि आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत काही लोकांनी यातील जमीन आपल्याकडे गहाण ठेऊन घेतली आहे. ते आता दबाव तंत्राचा वापर करीत शेतजमिनीवर हक्क बजावित आहे. ७७ कुटुंबांना अर्थार्जनाचे साधन असलेली ही शेतजमीन गेल्या कित्येक वर्षांपासून ही मंडळी कसत आहे. त्यापैकी काहींचा मृत्यू झाला असून वारसा हक्काने ती जमीन त्यांचे वंशच वाहत आहेत. अनेकांच्या अर्थार्जनाचा ही जमीनच मोठा आधार आहे. मठानेही सकारात्मक भूमिका घेत शेतकऱ्यांना अल्पदरात जमीन कसण्यासाठी दिली आहे. मात्र आता या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे. त्यामुळे ही जमीन मक्तेदारांकडे राहणार की आणखी कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.