जिल्ह्यात केवळ ११ टक्के पीककर्ज वाटप
By Admin | Updated: May 31, 2014 00:12 IST2014-05-31T00:12:43+5:302014-05-31T00:12:43+5:30
जिल्हय़ात ८ लाख ४0 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्यांना १ हजार ५८९ कोटी पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. यापैकी केवळ ११ टक्के वाटप झाले आहे.

जिल्ह्यात केवळ ११ टक्के पीककर्ज वाटप
यवतमाळ : जिल्हय़ात ८ लाख ४0 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्यांना १ हजार ५८९ कोटी पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. यापैकी केवळ ११ टक्के वाटप झाले आहे. यामध्येही जिल्हा मध्यवर्ती बॅंक व विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बॅंक यांनीच सर्वाधिक कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांनी शेतकर्यांची निराशा केली आहे.
कर्जवाटपाच्या एकूण उद्दिष्टापैकी सर्वाधिक वाटा हा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा आहे. या बॅंकेने ६00 कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र एवढी तरतूद नसल्याने ४00 कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. यापैकी ५0 टक्के रक्कम म्हणजे २00 कोटींचे कर्ज शेतकर्यांमध्ये वितरित करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकाकडून कर्ज वितरणात मिळत असलेला अल्प प्रतिसाद डोकेदुखी ठरत आहे. याच मुद्यावर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखानिहाय कर्जवाटपाचा आढावा घेण्यासाठी ३ जून रोजी बैठक बोलावली आहे.
खरीप आढावा बैठकीत मुंबई येथे जिल्हय़ातील स्थितीबाबत उहापोह करण्यात आला. जिल्हय़ाला मागच्या वर्षी बियाणे कंपन्यांनी ५३ टक्के सोयाबीन बी उपलब्ध करून दिले होते. तर ४३ टक्के बियाणे शेतकर्यांनी स्वत:कडचे वापरले होते. मात्र यावर्षी महाबीज व बियाणे कंपन्या यांनी योग्य पुरवठा केला नाही. शिवाय शेतकर्यांकडे असलेल्या सोयाबीनचीही उगवण शक्ती तपासली जात आहे. या बैठकीमध्ये कृषीपंपाच्या वीज जोडणीचे पैसे भरूनही प्रस्ताव रखडले आहे. हे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश वीज कंपनीच्या अधिकार्यांना देण्यात आले. याशिवाय खताच्या उपलब्धतेबाबतही विचारणा करण्यात आली. युरियाची एका विशिष्ट काळातच अचानक मागणी वाढत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत खत व्यवस्थापन समितीकडे सूचना देण्यात आल्या. जिल्हय़ाला यावर्षी कृषी उत्पन्नात दहा टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले.
(कार्यालय प्रतिनिधी)