पावसाचे दीड तास तांडव
By Admin | Updated: June 15, 2017 01:01 IST2017-06-15T01:01:27+5:302017-06-15T01:01:27+5:30
शहरात मंगळवारी रात्री अवघ्या दीड तासात ९६ मिमी पाऊस कोसळल्याने सर्वांचीच दाणादाण उडाली.

पावसाचे दीड तास तांडव
पुसदमध्ये ९६ मिमी : घरात पाणी, वृक्ष उन्मळले, भिंत कोसळली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरात मंगळवारी रात्री अवघ्या दीड तासात ९६ मिमी पाऊस कोसळल्याने सर्वांचीच दाणादाण उडाली. या पावसात एसटी आगाराची सुरक्षा भिंत कोसळली असून वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठाही खंडित झाला होता. सखल भागातील अनेक घरात पाणी शिरले असून रामनगरमध्ये रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. या पावसात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.
पुसद शहरात मंगळवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता अवघ्या दीड तासात पावसाने कहर केला. दहा वर्षात पहिल्यांदाच दीड तासात ९६ मिमी पावसाची नोंद झाली. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी दुकानातही पाणी शिरल्याने चांगलीच तारांबळ उडाली. बाजार समितीच्या व्यापार संकुलातील बजाज ट्रेडर्स, गाजीयानी ट्रेडर्स, संजय सायकल स्टोअर्स, पद्मावार यांचे दुकान, बापुराव भगत यांच्या कापड दुकानात दोन ते तीन फूट पाणी साचले होते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. खरेदी विक्री संघाच्या व्यापार संकुलातील आशीष बुक डेपोत पाणी शिरल्याने तळे साचले होते. रात्री १ वाजता दुकान संचालकांनी पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वीजपुरवठा खंडित झाल्याने शक्य झाले नाही.
शिवाजी वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, तुकाराम बापू वॉर्ड, वसंतनगर, सुभाष वॉर्ड, गढी वॉर्ड यासह अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले. तुकाराम बापू वॉर्डातील एका घरासमोर झाड उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. पुसद आगाराची सुरक्षा भिंत कोसळली. त्यामुळे तेथे दगडांचा खच पडला होता. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून वीज तारांवर पडल्याने शहराचा वीज पुरवठा बुधवारी पूर्णत: बंद होता. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. येथील तलाव ले-आऊटमधील वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयासमोरील मैदानाला अक्षरश: तलावाचे स्वरूप आले होते.
मान्सूनपूर्व कामाकडे दुर्लक्ष
पुसद नगरपरिषदेने मान्सूनपूर्व कामाकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी रात्री नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. नाल्यातील पाणी रस्त्यावर येत असून सुभाष चौक व इतर वॉर्डातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मान्सूनपूर्व सफाई वरवर करण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे नागरिक सांगत होते. शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता विभाग कमी पडल्याचेही दिसून आले. मोठ्या प्रमाणात नालीतील घाण रस्त्यावर आल्याने दुर्गंधीचा सामनाही करावा लागत आहे.
मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने तालुक्यातील तीन-चार गावातील शेती खरडून गेली. सुमारे ५० हेक्टर जमिनीत पाणी शिरले. बोरगडी येथे एका शेतातील केळीचे मोठे नुकसान झाले. दीड तासाच्या कालावधीत अतिवृष्टी होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. कालच्या पावसाने तालुक्यात कुठेही प्राणहानी झाली नाही.
- डॉ.संजय गरकल, तहसीलदार
दिग्रसच्या धावंडाचा पूल पाण्याखाली
दिग्रस शहरासह तालुक्यात मंगळवारच्या रात्री ९ वाजता मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने धावंडा नदीला पूर आल्याने आर्णी मार्गावरील पूल रात्रभर पाण्याखाली होता. तसेच तालुक्यातील अनेक शेतशिवारात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात जवळपास सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यातील सेवानगर, रुई येथील नाल्याला आलेल्या पुरात सुरेश राठोड, नारायण भट्टड, झिपरा डांगरे, चापला नाईक, पार्वतीबाई राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. यामुळे दोन दिवसांपूर्वी पेरलेले बियाणे खरडून गेले. इसापूरलगतच्या नाल्याला आलेल्या पुरात निरज चिंतावार, मंदा चिंतावार यांची पेरणी खरडून गेली. पावसामुळे मोरणा नाला तुडूंब भरून वाहत होता, तर शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या धावंडा नदीला महापुराचे स्वरूप आले होते. नदीतीरावरील घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले.