कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट पायदळी
By Admin | Updated: August 31, 2015 02:20 IST2015-08-31T02:20:10+5:302015-08-31T02:20:10+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी शासनाने आदेश दिले असले तरी या बँकांनी कर्जपुरवठ्याचे उद्दीष्ट पायदळी तुडविल्याचे दिसत आहे.

कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट पायदळी
महागाव : तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी शासनाने आदेश दिले असले तरी या बँकांनी कर्जपुरवठ्याचे उद्दीष्ट पायदळी तुडविल्याचे दिसत आहे. बँकांमध्ये शेतकऱ्यांची दररोज गर्दी होत असून उंबरठे झिजवून शेतकरी त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकां दलालांच्या विळख्यातच अडकल्याचे दिसत आहे.
भारतीय स्टेट बँक आणि युनियन बँक शेतकऱ्यांना विचारायला तयार नाही. फुलसावंगीच्या सेंट्रल बँकेला कारणेदाखवा नोटीस देण्यात आली. बँक व्यवस्थापनाकडून मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. कोणत्या बँकेने किती कर्ज पुरवठा केला याची आकडेवारी राष्ट्रीयकृत बँका लपवून ठेवत आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा देण्यासाठी बँकेने स्वत:हूनच बंदी आणली आहे. जुनी प्रकरणे अद्यापही हातावेगळी झालेली नाही. त्यामुळे नव्या शेतकऱ्यांना बँकेचे दार बंद करण्यात आले आहे. आॅगस्ट संपला तरी पीक कर्जाचे ओझे कमी झाले नाही.
सोयाबीनवर खोडकीड आल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु त्यांच्याजवळ कीटकनाशक घेण्यासाठीही पैसे नाही. कर्जाचे पुनर्गठण होईल आणि शेतकरी उभी करता येईल या आशेत शेतकरी बँकेचे उंबरठे झिजवित आहे. परंतु बँकेत शेतकऱ्यांना साथी सौजन्याची वागणूकही मिळत नाही. युनियन बँक तर दलालांच्या विळख्यातच सापडल्याचे दिसत आहे. सामान्य शेतकरी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. बँक व्यवस्थापक फोन उचलत नसल्याची ओरड आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
युनियन बँकेत एक आणि स्टेट बँकेत दुसरा असा भेदभाव कर्ज वाटपात दिसत आहे. शासनाने कर्ज पुरवठा करण्यासाठी हेक्टरी घालून दिलेले नियम पायदळी तुडविले जात आहे.
जणू स्टेट बँक आपल्या खिशातूनच पैसा देत असल्याचा भास निर्माण करीत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जापासून वंचित आहे. एकीकडे सावकार बंदी आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी करावे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)