आता लग्नाची परवानगी म्हणजे अग्निदिव्य, यजमानांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:11+5:30
कोरोनाच्या नियमावलीत लग्न करताना प्रत्येक नियमांचे पालन करावे लागत आहे. त्याकरिता वधू आणि वर मंडळींना अलीकडच्या काळात मॅचिंग मास्क शिवले जात आहेत. अनेकांना बोलविण्याची, आतषबाजी न करण्याची नियमावली आहे. यामुळे ही मंडळी साध्या पद्धतीने विवाहबद्ध होत आहे. अनेकांनी काही महिन्यांपूर्वी मंगल कार्यालय, बिछायत, कॅटरर्स बूक केले. आता साध्या पद्धतीत हे सगळे कार्यक्रम रद्द झाले आहेत. यामुळे वधू आणि वरपिता या मंडळींना पैसे परत करण्याची मागणी करतात.

आता लग्नाची परवानगी म्हणजे अग्निदिव्य, यजमानांची कसरत
लाेकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले. आज ना उद्या कोरोना संपेल आणि आपल्या मुलांचे लग्न थाटात करू, या विचाराने अनेकांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या. मात्र, कोरोना संपायचे नाव घेत नाही. त्याचा धोकाही थांबला नाही. या परिस्थितीत लग्नकार्य उरकून टाकण्याची घाई लग्नघरातील प्रमुख मंडळींना लागली आहे.
कोरोनाच्या नियमावलीत लग्न करताना प्रत्येक नियमांचे पालन करावे लागत आहे. त्याकरिता वधू आणि वर मंडळींना अलीकडच्या काळात मॅचिंग मास्क शिवले जात आहेत. अनेकांना बोलविण्याची, आतषबाजी न करण्याची नियमावली आहे. यामुळे ही मंडळी साध्या पद्धतीने विवाहबद्ध होत आहे. अनेकांनी काही महिन्यांपूर्वी मंगल कार्यालय, बिछायत, कॅटरर्स बूक केले. आता साध्या पद्धतीत हे सगळे कार्यक्रम रद्द झाले आहेत. यामुळे वधू आणि वरपिता या मंडळींना पैसे परत करण्याची मागणी करतात. मात्र, एकदा मिळालेला ॲडव्हान्स परत मिळत नाही. याशिवाय या मंडळींचाही रोजगार बुडाला आहे. या सर्व बाबींचा फटका लग्नघरी बसला आहे. पत्रिका नाही त्याजागी व्हाॅट्सॲप आणि थेट प्रसारण करण्यासाठी फेसबूक लाईव्ह वापरले जात आहे.
लग्नासाठी नियमावली
लग्नासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळी नियमावली आहे. यवतमाळ जिल्ह्यात साधे आणि सोपे नियम आहेत. यामध्ये प्रामुख्याने लग्नासाठी ५० वऱ्हाडी मंडळी ठेवण्याचा आदेश आहे. याशिवाय लग्नमंडपी सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. सोबतच सोशल डिस्टन्स पाळावे लागणार आहे आणि मास्कचा वापर करायचा आहे.
लग्न म्हटलं तर गणगोत आलंच. आता कोरोनामुळे गणगोतामधील मंडळींना बोलवायचे की मित्रमंडळींना असा प्रश्न आहे. कोरोनामुळे लग्नमंडपी अनेक अडचणी येत आहेत. त्यातही शासनाच्या नियमावलीनुसार लग्नसोहळा पार पाडण्यासाठी तयारी केली जात आहे.
- गणेश बयस, वरपिता
परवानगीसाठी पार करावे लागते दिव्य
मंगल कार्यालयासाठी मोठा ॲडव्हान्स वर आणि वधूपित्यांनी दिला आहे. नवीन नियमांमुळे हा ॲडव्हान्स परत मागितल्यावर मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन पैसे परत करत नाहीत.
वधू आणि वरपिता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक मंडळींची परवानगी मिळावी, याकरिता चकरा माराव्या लागतात. मात्र नियमांचे उल्लंघन करू नका, असा सल्ला दिला जातो.
आमच्या घरातील भाऊबंदकी ७५ जणांच्यावर आहे. शासनाच्या नियमामुळे ५० लाेकांनाच बोलविता येणार आहे. मंगल कार्यालयात किमान २०० लोकांना तरी परवानगी पाहिजे होती. आता कोणाला बोलवावे, हा प्रश्न आहे. लग्नप्रसंग ऑनलाईन प्रसारित होणार आहे.
- पंडित हिंगासपुरे, वधूपिता