आता पोषण आहार साठ्याचा शाळेत फलक
By Admin | Updated: March 31, 2015 01:56 IST2015-03-31T01:56:39+5:302015-03-31T01:56:39+5:30
शालेय पोषण आहारातील गैरप्रकार थांबविण्यासाठी आता प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात धान्यसाठ्याचा

आता पोषण आहार साठ्याचा शाळेत फलक
यवतमाळ : शालेय पोषण आहारातील गैरप्रकार थांबविण्यासाठी आता प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात धान्यसाठ्याचा फलक लावण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. यातून या योजनेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गावपातळीवर शाळांना शासकीय कंत्राटदारामार्फत पोषण आहार पुरविला जातो. कंत्राटदाराने किती किलो धान्य पुरविले याची माहिती शाळा देत नाही. यातून पालक अंधारात असतात. तर शासकीय कंत्राटदार कमी धान्य देऊन शाळांची फसवणूक करतात. पोषण आहारावर कोट्यवधीचा खर्च होतो. यानंतरही कंत्राटदाराकडून निकृष्ट धान्य पुरविले जाते. यात कंत्राटदारांचे चांगभले होते. या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. शाळेला मिळालेला पोषण आहार किती किलो आहे. यामध्ये मिळालेला कोटा आणि शिल्लक कोटा याची माहिती फलकावर दररोज सादर करावी लागणार आहे. हा फलक शाळेच्या दर्शनी भागावर लावावा लागणार आहे. यामुळे पोषण आहारातील धान्याच्या हेराफेरीला आळा बसणार आहे. पोषण आहाराचा साठा आणि शिल्लक साठा याची माहिती क्षणार्धात कळणार आहे.
(शहर वार्ताहर)