आता प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर शवविच्छेदन
By Admin | Updated: November 26, 2014 23:13 IST2014-11-26T23:13:01+5:302014-11-26T23:13:01+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना शवविच्छेदनासाठी तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणीच यावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर बांधण्यात आलेले शवविच्छेदन

आता प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर शवविच्छेदन
यवतमाळ : ग्रामीण भागातील नागरिकांना शवविच्छेदनासाठी तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणीच यावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर बांधण्यात आलेले शवविच्छेदन गृह पूर्ववत कार्यान्वित करण्याचा ठराव जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन गृहांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींपैकी केवळ सहा ठिकाणी किरकोळ दुरुस्ती करून शवविच्छेदन करणे शक्य होते, असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून बैठकीत ठेवण्यात आला. यामध्ये उमरखेड तालुक्यातील ढाणकी, झरी तालुक्यातील मुकुटबन, पांढरकवडा तालुक्यातील रुंझा, वणी तालुक्यातील शिरपूर, दारव्हा तालुक्यातील बोरीअरब आणि यवतमाळ तालुक्यातील वडगाव जंगल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या शवविच्छेदन गृहांची डागडूजी केली जाणार आहे. शिवाय या आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर पारवा, वाढोणाबाजार, खंडाळा, कोरटा, फेट्रा, शेंबाळपिंपरी येथील शवविच्छेदन गृहांच्या इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने येथे पुन्हा काम सुरू करणे शक्य नाही. ज्या ठिकाणी शवविच्छेदन करणे शक्य आहे अशा सहा केंद्रांमध्ये तातडीने किरकोळ दुरुस्तीचे काम केले जावे, असे निर्देश आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे यांनी बैठकीत दिले.
आरोग्य समितीच्या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथील बांधकामाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. कार्यकारी अभियंता नितनवरे, उपविभागीय अभियंता मशरू आणि भोलशंकर यांना निर्देश देण्यात आले. बऱ्याच ठिकाणी आरोग्य केंद्राच्या इमारती हस्तांतरित झालेल्या नाही तर काही ठिकाणी उपकेंद्राच्या इमारतीचे काम रखडले आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले.
सध्या गावांमध्ये डेंग्यूच्या साथीचा प्रकोप आहे. गावातील डासांचे निर्मूलन करण्यासाठी सर्व तालुकास्तरावर फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामपंचायतीने त्याची मागणी केल्यास त्वरित दिल्या जातात. ग्रामपंचायतीने फॉगिंगसाठी पेट्रोल, डिझेल आणि माणसाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्या बाबतची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर पोहोचविण्यात आली आहे. याचाही आढावा यावेळी घेण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुंदन राठोड, हिवताप अधिकारी डॉ.सुरेश तरोडेकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)