सौर ऊर्जापंप योजनेला शेतकऱ्यांचा ‘नो-रिस्पॉन्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:47 IST2017-12-18T22:46:36+5:302017-12-18T22:47:43+5:30
दुर्गम क्षेत्रातील कृषि पंपाना वीज पुरवठा करणे अशक्य झाले. अशा ठिकाणी सौर पंप जोडण्याचा प्रस्ताव होता.

सौर ऊर्जापंप योजनेला शेतकऱ्यांचा ‘नो-रिस्पॉन्स’
रूपेश उत्तरवार ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : दुर्गम क्षेत्रातील कृषि पंपाना वीज पुरवठा करणे अशक्य झाले. अशा ठिकाणी सौर पंप जोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र ही योजना गुंडाळली जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आल्याने सौर कृषी पंपांसाठी निम्म्याच शेतकऱ्यांनी स्वत:चा वाटा वीज कंपनीकडे जमा केला आहे.
जिल्हा आदिवासीबहुल आणि डोगरदºयात वसलेला आहे. अनेक तालुक््यात डोंगरी भाग आहे. अद्याप अशा भागापर्यंत वीज जोडणी पोहोचली नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही कृषी पंप जोडणीसाठी वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे दुर्गम क्षेत्र आणि ज्या भागामध्ये अद्याप वीज वाहिनी पोहोचली नाही, अशा भागातील शेतकऱ्यांना कृषी पंपाना वीज पुरवठा देण्याकरिता सौर योजना हाती घेण्यात आली. महावितरणने शेतकऱ्यांकडून अर्ज मागितले आहे. या योजनेला शेतकऱ्यांकडून प्रथम चांगला प्रतिसाद लाभला. मात्र वीज कंपनीकडून ही योजनाच गुंडाळण्याची हालचाल सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले. यामुळे स्वत:चा वाटा भरायचा किंवा नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडले आहे.
अशी आहे अर्ज संख्या
सौर पंपाकरिता जिल्ह्यातील एक हजार ८८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत केवळ ५९० शेतकऱ्यांनी पैसे जमा केले. त्यातील ४५५ शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंपाची जोडणी मिळाली आहे. मात्र इतर शेतकऱ्यांनी अद्याप पैसे भरले नाही.
डिमांड देऊच नका
वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांनी सौर पंपाकरिता नव्याने डीमांड ड्रॉफ देऊ नका, अशा सूचना दिल्या. दरम्यान, यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले, त्यांना वीज जोडण्या मिळतील, असे वीज कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.