नऊ हजार कोळसा कामगार संपावर जाणार
By Admin | Updated: June 17, 2017 01:16 IST2017-06-17T01:16:55+5:302017-06-17T01:16:55+5:30
केंद्र शासनाच्या कोळसा कामगार धोरणाविरुद्ध १९ जूनपासून आयोजित काम बंद आंदोलनात वणी तालुक्यातील

नऊ हजार कोळसा कामगार संपावर जाणार
१९ पासून काम बंद आंदोलन : वेकोलिला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : केंद्र शासनाच्या कोळसा कामगार धोरणाविरुद्ध १९ जूनपासून आयोजित काम बंद आंदोलनात वणी तालुक्यातील तब्बल नऊ हजार कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील १२ खाणीतील कोळशाचे उत्पादन ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातून वेकोलिला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
इंटक, बीएमएस, एच.एम.एस., आयटक, सीटू या पाच संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त संघर्ष समितीची स्थापना केली असून या समितीच्या नेतृत्वाखाली १९ जूनपासून हा संप पुकारण्यात येत आहे. वणी तालुक्यात हा संप यशस्वी करण्यासाठी संघटनांचे पदाधिकारी प्रत्येक कोळसा खाणीत जाऊन तेथे कामगारांच्या सभा घेत आहेत. तीन वर्षांपूर्वी केंद्रात स्थापन झालेल्या भाजपा सरकारने ‘सबका साथ सबका विकास’ असा नारा दिला होता. मात्र तो नारा आता फोल ठरल्याचा आरोप आंदोलनकर्त्या संघटनांनी केला आहे.
पूर्वी कोळसा खाणी खासगी मालकांच्या ताब्यात होत्या. मात्र देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कठोर निर्णय घेऊन एका रात्रीतून कोळसा खाणींचे राष्ट्रीयकरण केले होते. त्यानंतर देशातील कोळसा उद्योग भरभराटीस आला. कामगारांना चांगले वेतन मिळू लागले. सोईसुविधाही मिळाल्या. त्यासाठी सीएमपीएफची निर्मिती केली. परंतु अलिकडे देशातील बड्या उद्योजकांच्या नजर या कोळसा खाणींवर पडल्या असून खाणींचे खासगीकरण करण्यासाठी अनेक कोळसा खाणी बंद पाडण्यात येत आहे.
ज्या कंत्राटदाराला कोळसा खाण देण्यात येईल, त्या कंत्राटदाराला कामगारांच्या पीएफचा पैसा भरणे जड जाणार असल्याने केंद्र सरकारने पीएफचे रूपांतर ईपीएफमध्ये करण्याचा घाट घातला आहे. तसे झाल्यास एका वेकोलि कर्मचाऱ्याचे १५ ते २० लाख रुपयांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातून निवृत्ती वेतनावरही परिणाम होणार आहे. भारत सरकारच्या या धोरणाविरुद्ध देशातील चार लाख कोळसा कामगार संपात उतरणार आहेत.
वणी परिसरात राजूर, भांदेवाडा, कुंभारखणी, घोन्सा, कोलारपिंपरी, पिंपळगाव, जुनाडा, उकणी, निलजई-१, निलजई-२, नायगाव, मुंगोली अशा १२ कोळसा खाणी असून त्यातील तीन भूमिगत कोळसा खाणी आहेत.
संपापूर्वी मागण्यांवर सरकारने विचार न केल्यास संपादरम्यान, देशातील थर्मल पॉवर स्टेशनवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे आंदोलन अतिशय तिव्र असून कोळसा खाणीतील पाणी उपसण्याचे मोठे पंपदेखील बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यासंपात वणी सायडींग, जीएम आॅफीससह भालर येथील वेकोलिच्या रुग्णालयातील कर्मचारीदेखील सहभागी होणार असल्याने आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. २१ जूनपर्यंत हा संप सुरू राहणार आहे.
कोळसा कामगारांच्या अशा आहेत मागण्या
वेकोलि कामगारांचा १० वेतन समझोता एक वर्षापासून प्रलंबीत आहे. हा प्रश्न सरकार सोडविण्यासाठी तयार नाही. त्यामुळे या मागणीसह अन्य सात मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत आहे. सीएमपीएफचे रुपांतर ईपीएफमध्ये करण्यात येऊ नये, वर्तमानस्थितीप्रमाणे पेन्शन योजना सुरू ठेवण्यात यावी, ठेकेदारी पद्धतीने कोळशाचे उत्खनन बंद करण्यात यावे, समान काम समान वेतन देण्यात यावे, नेमून दिलेल्या काळापेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक कामाचे वेतन देण्यात यावे, कोळसा खाणी बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा आदी मागण्या संपाद्वारे करण्यात येणार आहे.